Breaking News

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा महाअंतिम फेरीचे आज उद्घाटन

विजेत्या एकांकिकेला एक लाख आणि मानाचा ‘अटल करंडक’

पनवेल ः प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा होत असून, स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवार (दि. 29)पासून पनवेलमध्ये प्रारंभ होत आहे. यंदा स्पर्धेचे सातवे वर्ष असून सिने-नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती या वेळी लाभणार आहे. स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये व मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल मनपाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 28) मार्केट यार्ड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस स्पर्धा सचिव व सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, स्पर्धा सचिव व प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, अ‍ॅड. चेतन जाधव, अमोल खेर, गंभीर दांडेकर, अमरिश मोकल, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रोहित जगताप, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.
या वेळी पत्रकारांना माहिती देताना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की, पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार्‍या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 29) सकाळी 9 वाजता होणार आहे, तसेच स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 31) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असून, प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि 99व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी उपस्थित राहणार आहेत. या वेळी सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर, जयंत वाडकर, लेखक-दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता अद्वैत दादरकर, प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख, प्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, प्रसिद्ध अभिनेते भरत सालवे, प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंझारराव, कवी व प्रसिद्ध अभिनेते राहुल वैद्य आदी उपस्थित राहणार आहेत.
आपल्या परिसरात विविध राज्यांतील बहुभाषिक नागरिक नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. त्यांनाही मराठी नाट्यकलेची माहिती व्हावी यासाठी प्री इव्हेंट घेण्यात आले होते, अशी माहिती सभागृह नेते परेश ठाकूर यांनी देऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, दरवर्षी ही स्पर्धा डिसेंबर महिन्यात होत होती, पण यंदा कोरोनामुळे काही मर्यादा आल्या, तसेच डिसेंबरमध्ये कोरोनाचा दुसरा स्टेन येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याची भीती होती, मात्र कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर स्पर्धेच्या आयोजनासाठी आग्रही राहिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धा दर्जेदार व रसिकांच्या पसंतीची ठरावी यासाठी मेहनत घेतली जात आहे.
त्याचबरोबर कोरोनाच्या दृष्टिकोनातून पुरेपूर काळजी घेण्यात येणार असून, कोरोनासंदर्भात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून स्पर्धा होणार आहे. राज्यातील मुंबई, रायगड, बारामती, धुळे, सांगली, औरंगाबाद, नाशिक, सातारा, इचलकरंजी, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, बीड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे आदी जिल्ह्यांतील एकूण 75 एकांकिकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातील 24 एकांकिकांची निवड महाअंतिम फेरीसाठी झाली, अशी माहितीही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या वेळी दिली.
नाट्य चळवळ वद्धिंगत करण्यासाठी व नाट्य रसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावेत, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे व हौशी कलावंत स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्या 24 एकांकिका
दुसरा आइन्स्टाइन (सौ. नलिनी यशवंत दोडे विद्यालय, मुलुंड), विसर्जन (श्रुजन कलामंच, बोरिवली), यंदा कर्तव्य आहे (के. इ. एस कॉलेज, मुंबई), घरोट (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई), वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), नातं (व्हाइट लाइट, ठाणे), स्टार (जिराफ थिएटर, मुंबई), 12 किमी (ए. एस. एम. प्रोडक्शन, मुंबई), लव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिप (आमचे आम्ही, पुणे), क्लिक (ओम साई कलामंच, वसई), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), पँडल (रिफ्लेशन थिएटर, पनवेल), लकडबगधा (दवेरथ थिएटर, डोंबिवली), आर ओके (सी. के. टी. कॉलेज, पनवेल), बारसं (कलांश थिएटर, रत्नागिरी), नंगी आवाज (कोकण ज्ञानपीठ, उरण), गुंतता (निर्मिती, वसई), भाद्रपद (कलारंग सामाजिक संस्था, अलिबाग), लॉटरी तिकीट (कला कारखाना, कांदिवली), शुद्धता गॅरेंटेड अर्थात पाणी (मॉर्निंग ड्रीम एंटरटेनमेंट, मुंबई), बेड टाइम (रूद्र प्रोडक्शन, इचलकरंजी), कुणीतरी पहिलं हवं (बी. एम. सी. सी., पुणे), बिनविरोध (रंगपंढरी, पुणे), जाळ्यातील खिळे (बोलपट, पुणे).  

पारितोषिकांचे स्वरूप
प्रथम क्रमांक – 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक
द्वितीय क्रमांक – 50 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक – 25 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक – 10 हजार रुपये,
उत्तेजनार्थ क्रमांक – 5 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना, उत्तेजनार्थ अशी विविध पारितोषिके. 

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply