Breaking News

सरसकट खोदकाम थांबवून खारघरमधील रस्ते वाचवा!

भाजपची सिडकोकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

खारघर शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झाले असून, काही ठिकाणी ते चालू आहे. या पार्श्वभूमीवर सरसकट होणार्‍या खोदकामांना स्थगिती देऊन खारघरमधील रस्ते वाचवावेत आणि होणार्‍या त्रासापासून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी खारघर भाजपने केली आहे. याबाबतचे निवेदन सिडकोचे मुख्य अभियंता यांना भाजप पदाधिकार्‍यांनी सादर केले. ते अतिरिक्त मुख्य अभियंता एम. के. गोडबोले यांनी स्वीकारले.

भाजपने सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, आपणास ज्ञात असेलच की आपल्या कार्यालयाने अलीकडच्या काळात खारघर शहरात सतत गेली तीन वर्षे आम्ही पाठपुरावा केल्यावर काही ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण केले व काही ठिकाणी ते चालू आहे. अशा परिस्थितीत सिडको प्रशासनातर्फे खारघर शहरात अनेक ठिकाणी रिलायन्स फोरजी, महानगर गॅस, व्होडाफोनसारख्या अनेक कंपन्यांना नवीन केबल्स वा पाइपलाइन टाकण्यासाठी सरसकट खोदकामासाठी परवानग्या दिल्या आहेत.

आमच्या माहितीप्रमाणे पहिल्या टप्प्यात सुमारे 10 किमी रस्ता खोदण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र अनेक ठिकाणी मनमानी करून खोदकाम केल्याने रस्त्यांचे नुकसान होत आहे व काही ठिकाणी खोदाईदरम्यान पाण्याची पाइपलाइनच तोडण्याचे प्रसंग घडले आहेत. याबाबतच्या तक्रारी नागरिक आमच्या कार्यालयात घेऊन येत आहेत. तरी या कामांना स्थगिती देऊन खारघरच्या नागरिकांची होणार्‍या त्रासापासून सुटका करावी, अशी मागणी भाजपने सिडकोकडे केली आहे.

सिडकोला निवेदन देताना भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, तालुका संघटक प्रभाकर जोशी, कृष्णा खडगी उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य अभियंता एम. के. गोडबोले यांनी खारघरमध्ये चुकीच्या पद्धतीने चाललेले खोदकाम तातडीने थांबवून दोषींवर कारवाई करा, असे

निर्देश कार्यकारी अभियंता संजय पुडाले यांना दिले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply