Monday , February 6 2023

ममदापूर येथे जमिनीचा बोगस व्यवहार

उपसरपंचासह स्थानिकांची मालकिणीलाच दमदाटी

कर्जत : बातमीदार

बोगस व्यक्ती उभी करून तीन दलालांनी कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील एका महिलेच्या मालकीची जमीन परस्पर विकली. ही बाब माहीत नसलेली महिला जेव्हा आपल्या मालकीच्या जमिनीत झोपडी बांधायला गेली, तेव्हा जमीन विक्री करणार्‍यांनी तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या दलालांमध्ये ममदापूरच्या उपसरपंचाचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या शेतकरी महिलेने याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ममदापूर येथील सर्व्हे नं. 4/1ब, 4/1क या जमिनीच्या सुरेखा दुणदा शेंडे या मालक आहेत. या जमिनीची ममदापूरचे विद्यमान उपसरपंच जुबेर सिकंदर पालटे, मो. सुहेल हमीद आरबीवाला व तजमुल नजे यांनी 1995 साली बोगस स्त्री उभी करून विक्री केली होती. हा प्रकार माहीत नसलेल्या सुरेखा शेंडे या आपल्या जागेत झोपडी बनवायला गेल्या तेव्हा या तिघा दलालांनी त्यांची झोपडी तोडून सुरेखा शेंडे व त्यांचा भाऊ राजू मारुती शिंगे याला मारहाण केली व पुन्हा या जागेत पाऊल ठेवले तर जीवानिशी मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे शेंडे यांनी कर्जत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने फिर्यादी यांची बाजू समजावून घेत 156(33) अन्वये नेरळ पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नेरळ पोलिसांनी भादंवि कलम 420, 427, 447, 467, 471, 323, 504, 506(2), 34प्रमाणे जुबेर सिकंदर पालटे, मो. सुहेल हमीद आरबीवाला आणि तजमुल नजे यांच्याविरुद्ध फसवणूक व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम शिद करीत आहेत.

प्लॉट देतो असे सांगून महिलेची पावणेसहा लाखांची फसवणूक

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील खांदन येथे प्लॉट देतो, असे सांगून डोंबिवली येथील एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत त्या महिलेने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, मात्र त्या ठकास पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. कर्जत तालुक्यातील खांदन येथे आमराई प्रोजेक्ट चालू आहे. ही जाहिरात वाचून साधना भोळे (रा. डोंबिवली) यांनी जाहिरात देणारे विजय बेर्डे यांच्याशी संपर्क साधला व मला जमीन खरेदी करायची आहे, असे सांगितले. बेर्डे यांनी खांदन येथील प्लॉट नं. 45 (4209 स्क्वेअर फूट) दाखविला. हा प्लॉट साधना भोळे यांना आवडला. त्यांनी बयाना म्हणून दोन हजार रुपये बेर्डे यांना तत्काळ दिले. त्यानंतर दोन लाख 50 हजार तसेच तीन लाख 25 हजार रुपयांचा धनादेश असे एकूण पाच लाख 77 हजार रुपये बेर्डे यांना दिले. त्यानंतर सदरच्या प्लॉटची अगोदरच विक्री झाली असल्याचे सांगून बेर्डे यांनी भोळे यांना दुसरे प्लॉट  दाखवले, मात्र ते भोळे यांना पसंत आले नाहीत. सुमारे एका वर्षानंतर साधना भोळे यांनी विजय बेर्डे यांना माझे पैसे मला परत द्या, असे सांगितले. बेर्डे यांनी त्यांना धनादेश दिले, मात्र ते वटले नाहीत. त्यामुळे भोळे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विजय बेर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दीपक जोगदंड करीत आहेत.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply