नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त सिडको भवन येथे इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे सोमवारी (दि. 16) अभियंता दिन साजरा करण्यात आला. या वेळी बोलताना सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कोणत्याही देशाच्या जडणघडणीमध्ये अभियंत्यांचे मोलाचे योगदान असते. अभियंत्यांनी निर्मिलेल्या वास्तू व त्यांनी उभारलेले प्रकल्प यांच्यामुळेच देशाच्या विकासाचा पाया रचला जातो, असे उद्गार काढले.
या कार्यक्रमास सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक-1 डॉ. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक-2 अशोक शिनगारे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) आर. बी. धायटकर यांच्यासह सिडको इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. व्ही. नाडगौडा व इतर पदाधिकारी, विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते, तर जेम एंगसर्व्ह प्रा. लि.चे संचालक शशांक वैद्य आणि कॉर्पोरेट प्रशिक्षक संदीप सावंत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
वेगवेगळ्या कालखंडात निर्मिलेल्या वास्तू किंवा शहरे हा तत्कालीन अभियांत्रिकी कौशल्याचाच आविष्कार असल्याचे सांगत नवी मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर अशाच कल्पक आविष्काराचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे मत लोकेश चंद्र यांनी व्यक्त केले, तसेच सिडकोतील अभियंत्यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी आजवर दिलेले योगदान हे अजोड असल्याचे सांगत येणार्या काळातील महागृहनिर्माण योजना, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र, मेट्रो यांसारखे राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पही सिडकोतील अभियंते समर्थपणे पूर्णत्वास नेतील, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अभियंता दिनाच्या शुभेच्छा देत सिडकोतील तरुण अभियंते हे आपल्या पूर्वसुरींप्रमाणेच विविध प्रकल्पांकरिता अभिनव पद्धतीने योगदान देतील, असे मत व्यक्त केले.
खाडीकिनारी वसलेल्या दलदलीच्या भूभागाचे रूपांतर नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये करणार्या सिडकोतील अभियंत्यांचे कर्तृत्व हे खरोखरंच असामान्य म्हणावे लागेल, असे प्रतिपादन अशोक शिनगारे यांनी केले.
निसार तांबोली यांनी परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, सिडकोतील अभियंत्यांनी अडचणींचे व समस्यांचे रूपांतर संधींमध्ये करीत आपले कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे, असे म्हटले.
अभियंता दिनानिमित्त वर्षभरातील अद्वितीय कामगिरी व टेक्निकल पेपर या स्पर्धांतील विजेत्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला. टेक्निकल पेपर स्पर्धेंतर्गत प्रथम पारितोषिक देवेंद्र मोकल परिवहन अभियंता (नमुंआंवि); द्वितीय पारितोषिक हरियाली पाटील सहाय्यक अभियंता (पीपी-2), तृतीय पारितोषिक राजीव कोलप सहाय्यक कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा) व उत्तेजनार्थ पारितोषिक किरण राजूरकर सहाय्यक कार्यकारी अभियंता (नैना) यांना प्रदान करण्यात आले.
अद्वितीय कामगिरी (वैयक्तिक) स्पर्धेंतर्गत सहाय्यक अभियंता अधिराज कडू (उलवे-1), राहुल सरोदे (पाणी पुरवठा-1), विक्रम मुरादे (औरंगाबाद), धनराज कुरकुरे (विद्युत), सहाय्यक कार्यकारी अभियंता जगन्नाथ खराटे (मेट्रो-1), तात्याजी अहिर (मेट्रो-2), संजय गुजराथी (उलवे-1), पूनम कोकस (खारघर-1) आणि सहाय्यक परिवहन अभियंता अनिरुद्ध खानोलकर यांना गौरविण्यात आले. अद्वितीय कामगिरी (सांघिक) स्पर्धेंतर्गत संजय कर्हाड अधीक्षक अभियंता (गृहनिर्माण-2) यांच्या महागृहनिर्माण प्रकल्प संघाला, प्रवीण सेवतकर अधीक्षक अभियंता (पालघर) यांच्या पालघर नवीन शहर प्रकल्प संघाला आणि प्रणीत मूल यांच्या उलवे नदीप्रवाह परावर्तन प्रकल्प संघाला गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता सुरेश ठाकूर यांनी केले. सुरुवात शशांक वैद्य यांच्या कॉन्क्रिट चॅलेंजेस-प्रेसेंट एन्ड फ्युचर या विषयावरील व्याख्यानाने, तर सांगता सुप्रसिद्ध वक्ते संदीप सावंत यांच्या तरीही आनंदी जगता येतं या कार्यक्रमाने झाली.