Breaking News

मुंबईने दिल्ली जिंकली!

गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी झेप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

घरच्या मैदानावर खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्स संघावर 40 धावांनी मात करीत मुंबई इंडियन्सने बाराव्या हंगामात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहेत. मुंबईने दिलेल्या 169 धावांचे आव्हान दिल्लीच्या फलंदाजांना पूर्ण करता आले नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करीत दिल्लीच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला. या विजयाबरोबरच मुंबईने गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे.

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने दिल्लीच्या डावाची चांगली सुरुवात केली, मात्र राहुल चहरने दिल्लीच्या डावाला खिंडार पाडले. धवन आणि शॉ माघारी परतल्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांनी आपल्या आक्रमणाची धार धारदार करीत दिल्लीला बॅकफूटला ढकलले. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, कॉलिन मुनरो हे फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकले नाहीत.

अखेरच्या फळीत अक्षर पटेल आणि ख्रिस मॉरिस यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दिल्लीसमोरचे आव्हान हे अशक्यप्राय अवस्थेत गेले होते. अखेरीस मुंबईने धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर उडी मारली आहे. मुंबईकडून राहुल चहरने तीन, जसप्रीत बुमराहने दोन बळी घेतले. त्यांना लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी, घरच्या मैदानावर खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सला 168 धावांवर रोखण्यात यश मिळवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय काहीसा उलटला. चांगली सुरुवात झाल्यानंतरही मधल्या फळीत भागीदारी न होऊ शकल्यामुळे मुंबईला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत मुंबईच्या धावगतीला वेसण घातली.

रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. मुंबई मोठी धावसंख्या गाठेल असे वाटत असतानाच अमित मिश्राने रोहितचा त्रिफळा उडवला. या खेळीदरम्यान रोहितने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये आठ हजार धावांचा टप्पा ओलांडला. रोहित माघारी परतल्यानंतर बेन कटिंगही लवकर माघारी परतला.

यानंतर फलंदाजांनी मैदानात तळ ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठी खेळी रचण्यात त्यांना अपयश आले. अखेरीस हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंनी शेवटच्या षटकांत फटकेबाजी करीत मुंबईसाठी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात वाटा उचलला. दिल्लीकडून कगिसो रबाडाने दोन बळी टिपले, तर अक्षर पटेल आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक गडी बाद केला.

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply