खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील चौक हद्दीतील काही हॉटेल, गोडाऊन आणि शोरूम चालक बिनशेती न करता जागेचा वाणिज्य वापरासाठी बिनधोक वापर करीत असून, त्यामुळे खालापूर तहसीलला लाखो रूपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966प्रमाणे कलम 44प्रमाणे जागेचा वापर वाणिज्य कारणासाठी करायचा असेल तर बिनशेती करणे आवश्यक आहे, परंतु चौक गावाजवळून गेलेल्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक धनिकांच्या नजरा मोक्याच्या जागेवर गेल्या आहेत. ग्रामपंचायत, महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता तेथे हॉटेल, ढाबा, गोडाऊन तसेच नामांकित कंपन्यांचे शोरूम्स उभे राहिले आहेत. अशा अतिक्रमणांना नोटीस काढून त्यांच्याकडून दंडाची वसुली करण्याची तरतूद आहे तसेच नोटीस दिल्यानंतर सहा महिन्यांत नियमित न केल्यास अतिक्रमण तोडण्याचे अधिकार असतानादेखील महसूल विभाग कानाडोळा करीत आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नियमावलीप्रमाणे जमीन वापरात बदल केल्यास बिनशेती जमीन आकाराच्या चाळीस पट दंड व उपकरासह वसुलीचे अधिकार महसूल विभागाला असतानादेखील महसूल विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.
-सुरेश गावडे, माहिती अधिकार कार्यकर्ता, चौक
बिनशेती न करता जमिनीचा वाणिज्य कारणासाठी वापर करणार्यांना नोटीस देऊन वापर सुरू असलेल्या तारखेपासून दंडाची रक्कम तलाठी वसूल करेल. अशा प्रकारे सुरू असलेल्या एका शोरूमला नोटीस देऊन सुमारे दोन लाख 68 हजार 300 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. इतरांवरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल.
-नितीन परदेशी, मंडल अधिकारी, चौक, ता. खालापूर