मुरूड : प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुरूड शहराची लोकसंख्या 12 हजारांच्या आसपास असून या वाढत्या लोकसंख्येला नगर परिषदेतर्फे आंबोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या पाच दिवसांपासून या धरणातून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आंबोली धरणावर नगर परिषदेचा फिल्टर प्लँट आहे, मात्र पाण्याला दुर्गंधी येऊ लागल्याने सदरचा फिल्टर प्लँट बंद असल्याचे बोलले जात आहे. नगर परिषदेने ही समस्या तातडीने दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.
पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष देण्यात येईल. लवकरच या पाणीपुरवठा योजनेतील फिल्टर टँक व पाण्याची टाकी साफ करण्यात येईल.
-प्रमोद भायदे, पाणीपुरवठा सभापती, मुरूड नगर परिषद