Monday , January 30 2023
Breaking News

कर्जत रेल्वेस्थानक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात

कर्जत : बातमीदार

येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट तीनच्या बाहेर असलेला पादचारी पूल आणि तिकीट खिडकी परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे  लोकल गाडी पकडण्यास आलेल्या प्रवाशांना त्रास होत असून, या अतिक्रमण करणार्‍यांना वेळीच आवरा, अशी सूचना कर्जत पॅसेंजर असोसिएशनने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेला केली आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर कर्जत रेल्वे स्थानकाच्या भिसेगाव  बाजूला एक तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. त्या तिकीट खिडकीसमोर गतवर्षी पादचारी पूलही उभारण्यात आला आहे. त्या पादचारी पुलाच्या पायर्‍यांवर आणि समोर तसेच तिकीट खिडकीच्या मार्गावर फेरीवाले मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करीत आहेत. भिसेगाव दिशेकडे उतरणार्‍या पादचारी पुलाखाली घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भिसेगाव दिशेकडील तिकीट खिडकीजवळ कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्या कारणाने या परिसरात दुचाकी वाहने नेहमीच उभी असतात. काही फळ आणि भाजीविक्रेत्यांनी तिकीट खिडकी आणि पादचारी पुलाला लागूनच आपली दुकाने थाटली आहेत. त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत असून, गाडी पकडण्यासाठी येणार्‍या प्रवाशांचे येथून वाट काढताना प्रचंड हाल होत आहेत. त्यात फेरीवाले  काही वेळा दादागिरीदेखील करीत असतात. कर्जत रेल्वे स्थानकाच्या भिसेगाव बाजूकडील तिकीट खिडकी परिसरातील अतिक्रमणे हटवून तेथे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे कर्जत पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply