Breaking News

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी धडाकेबाज ‘करून दाखवले!’

भारत निवडणूक आयोग 2019च्या सार्वजनिक लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाचे बिगुल केव्हाही वाजविण्याची शक्यता असल्यामुळे देशात सर्वत्र एकदम लगबग वाढली आहे. एका बाजूला पुलवामाचा जबरदस्त बदला भारताच्या जवानांनी घेत ये तो सिर्फ झांखी है, बहोत कुछ अभी बाकी है ची चुणूक दाखवून दिली असून भारतीय लष्कराच्या तीनही सेना आणि या देशाचे लोकप्रिय कर्णधार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘अभिनंदन’ करावे तेवढे कमीच आहे. लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांच्या शब्दांत सांगायचे, तर नरेंद्र मोदी यांची छाती 56 नाही तर 156 इंचाची असल्याचे केवळ पाकिस्तानच नाही, तर संपूर्ण जगाला ‘एअर स्ट्राईक’च्या कारवाईत दिसून आले.

भारतीय जवानांचे ‘अभिनंदन’ करण्याऐवजी सारा देश अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आणि एरवी आपण पाच आणि शंभर असू, परंतु जगासमोर, दुष्मनांसमोर आपण एकशेपाच आहोत हे दाखवून देण्याची गरज असताना बोलबच्चन दिग्गीराजापासून, भिरभिरलेल्या ममता बॅनर्जींपर्यंत सार्‍या विरोधकांनी ‘एअर स्ट्राईक’चे बालाकोटच्या अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे पुरावे मागावेत यासारखी किळसवाणी बाब ती कोणती असू शकेल. केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग या माजी लष्करी अधिकार्‍यांनी यावर, पुढच्या वेळेस पुरावे मागणार्‍यांनाच विमानाला बांधून न्यावे लागेल, असा मुंहतोड जबाब दिला.

भारताच्या हवाई दलाच्या 12 लढाऊ विमानांनी बालाकोट तर अतिरेकी अड्ड्यांवर ज्या वेळी हल्ला केला त्या वेळी पहाटे 2.30 वाजता सारा देश सुरक्षितपणे निद्रादेवीच्या अधीन झाला होता आणि आकांडतांडव करून मोदींना बदनाम करू पाहणारे एकजात नेते आपापल्या वातानुकूलित कक्षात बिनधास्त झोपा काढत होते, पण त्या वेळी भारताचा प्रधानसेवक चौकीदार वॉररूममध्ये निर्मला सीतारामन, अजित डोवाल आणि तीनही लष्कर प्रमुखांसमवेत चहाचा, कॉफीचा वा पाण्याचा घोटही न घेता डोळ्यात तेल घालून भारतीय हवाई दलाचे बहाद्दर जवान शौर्याची साथ देत देशाचा पहारा देत होता. 12 विमानं परत येताच पहाटे 3.30 वाजता त्यांच्या कामगिरीचं कौतुक करून त्यांचे अभिनंदन करीत होता. पहाटे 5 वाजता पहिल्यांदा पाकिस्ताननं ट्विट करून, या अल्ला, या तौबा, हमने मार खाया, अशी किंकाळी देत होता. हाच खरा पुरावा होता. बालाकोटवर हल्ला होऊन अतिरेक्यांचा मसिहा मसूद अझरचे दोन भाऊ आणि मेव्हण्यासह असंख्य अतिरेकी अल्लाला प्यारे झाले होते की त्यांना जन्नत पण नसीब झाली होती की नाही हे त्यांचा खुदाच जाणे.

पहाटे 5.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तीनही लष्कर प्रमुख यांनी या लष्करी कारवाईचा आढावा घेतला. संपूर्ण रात्र डोळ्याला डोळा न लावणार्‍या आणि खर्‍या अर्थाने देशाची सुरक्षा नीटनेटकी अबाधित राखणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी विरोधाला विरोध म्हणून भूमिका घेऊन जगासमोर स्वतःचं हसं करून घेणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब किंबहुना 50/50 वर्ष राजकारणात घालवणार्‍या नेत्यांच्या अपरिपक्व प्रवृत्तीचं दर्शन यानिमित्ताने भारतातील सव्वाशे कोटी नागरिकांनी घेतलं. पाकिस्तानला दिलेल्या सणसणीत जवाबामुळे तिथली खानावळ वळवळ करण्याचं थांबविल्याचं दिसत आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या प्रकरणात सारं जग भारताच्या भूमिकेचे कौतुक करीत असताना आपण पाहिले आहे. त्यामुळे देशाच्या सीमेवर आपले जवान देशाच्या रक्षणासाठी आणि भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार्‍यांना मुंहतोड जबाब देण्यासाठी तैनात आहे, पण आपल्या देशाचे विरोधक (त्यात मेहबुबा मुफ्तीबाईचा समावेश आहे) आपल्या कर्मदरिद्रीपणाचे दर्शन उठता बसता घडवित आहेत, पण हाथी चले अपनी चाल…! याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कर्तव्याचा रथ यथायोग्य पद्धतीने हाकत आहेत.

देशाच्या सीमांचे रक्षण आणि देशाची सुरक्षा योग्य पद्धतीने हाताळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 125/130 कोटी नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यातही कोणतीही कसूर ठेवलेली नाही. आतापर्यंत महाराष्ट्राला केंद्राकडून नेहमीच सापत्नभावाची वागणूक काँग्रेस-यूपीकेच्या राजवटीनं मिळत आली आहे. राजीव गांधी यांचा मुंबईत जन्म झाल्याचा डांगोरा जाणत्या राजांनी पिटून त्या राजीव गांधी यांनी मुंबईसाठी कोण्या एकेकाळी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा करताना राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. हजारो कोटींचा महसूल मुंबई महाराष्ट्रातून केंद्राकडे जात असताना त्याच्या 10 टक्केसुद्धा मागणी करूनही कधी मिळाले नाही यासाठी भाजप-शिवसेनेच्या खासदारांनी वेळोवेळी संसदेत आवाजही उठवला, पण बहिर्‍या यूपीके सरकारच्या कानी या मागण्या कधी पडतच नाहीत, ऐकायलाच आल्या नाहीत, पण नरेंद्र मोदी यांचे सरकार महाराष्ट्राला ‘छप्पर फाडके’ मदतीसाठी पुढे धावून आले. मग सामाजिक असो की पायाभूत सुविधा असो किंवा देशाचा अन्नदाता बळीराजा असो. महाराष्ट्राला मोदी सरकारने झुकते माप दिले, पण 72 हजार कोटींचा डांगोरा पिटून निव्वळ पाच हजार कोटी डबघाईला आलेल्या संस्था व त्यांचे चालक यांचे खिसे भरणार्‍यांना काय करणार? 15 वर्षे महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसची राजवट असताना मनमोहन-सोनिया सरकारकडून साधी इंदु मिलच्या हस्तांतरणाची कागदपत्रे न मिळविणार्‍या कपाळकरंट्यांना मोदी सरकारने केवळ तीन महिन्यात ही कागदपत्रे स्मृती इराणींनी देवेंद्र फडणवीस यांच्या हाती रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली आणि तमाम दलित नेत्यांच्या उपस्थितीत इंदु मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घडवून आणले. या गोष्टी विरोधासाठी विरोध करणार्‍यांच्या विस्मृतीतच जाणार, असो!

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घेताना मुंबई वाहतूक प्रकल्प तीनला या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला मंजुरी देऊन मुंबईतील लाखो उपनगरी प्रवाशांना दिलासा मिळवून दिला. 54 हजार 777 कोटी रुपयांची, घसघशीत मदत मोदी सरकारने महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी केंद्राने हजारो कोटींची मदतही केली.

मुंबईत उपनगरी रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तीन मार्गिकांवर उपनगरी गाड्या धावतात आणि लाखो प्रवाशांची ही जीवनवाहिनी ओळखली जाते. देशात सर्वत्र जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर आणि वांद्रे येथून सुटतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सारे भाग या रेल्वेने जोडण्यात आले आहेत. कोकण रेल्वेचा विस्तार हा दिवा, आपटा, रोहा अशा रायगड जिल्ह्यातून जातो आणि या मार्गाने कोकणमार्गे गोवा, बेळगाव, कारवार, कर्नाटक आणि दक्षिणेकडे लोक लाखांच्या संख्येने ये-जा करतात. या रेल्वेची निगा राखून त्याची देखभाल, दुरुस्ती आणि नवे मार्ग टाकून प्रवाशांची सेवा करण्याचे अहर्निश कार्य रेल्वेतर्फे होत असते. महाराष्ट्रात प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, राम नाईक, सुरेश प्रभूंपासून पीयूष गोयलपर्यंत कर्तबगार रेल्वेमंत्री लाभले. त्याचा लाभ निश्चितपणे महाराष्ट्र आणि मुंबईला झाला.

वसई-दिवा या मार्गावर रेल्वे रूळ आहेत. पूर्वी या मार्गाला मालगाडी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत होती, पण रामभाऊ नाईक यांनी विरार डहाणूसारखी वसई दिवा अशी डीएमयू डिझेल मीटर युनिट अशी मध्ये इंजिन आणि पुढे-मागे दोन दोन डबे अशी सेवा सुरू केली. परशुराम टावरे हे भिवंडीचे आमदार असताना 1978 साली त्यांनी दिवा वसई मार्गावर लोकल वाहतूक सुरू करावी, अशी मागणी विधानसभेत केली होती, हीच मागणी मी देवेंद्र फडणवीस, सुरेश प्रभू यांच्यापासून संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत यांच्याकडे मांडताना बोरिवली ते कर्जत कसारा आणि विरार ते कर्जत कसारा अशी लोकल वाहतूक सुरू केल्यास दादरवरचा ताण कमी होऊन पश्चिमेकडून मध्य आणि मध्यकडून पश्चिमेला ये-जा करणार्‍या लाखो प्रवाशांचा वेळ, पैसा व मेहनत यांची बचत होऊ शकेल. याच मार्गाने पनवेल-रोहा मार्गे गाड्या कोकणात जातात. दिनेश पाटील, सुरेश गुप्ता व ओमप्रकाश चौहान या रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी त्यांच्या त्यांच्या व्यासपीठावरून ही मागणी रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयाकडे पुढे नेली. परिणाम काय झाला? तर वसई-दिवा मार्गे अलिबागपर्यंत लोकल वाहतूक सुरू करण्यातला अडथळा दूर झाला.

आता कर्जत, कसारा, पनवेलपासून विरार-बोरिवलीपर्यंत लोकल वाहतूक सुरू करण्यात आली, तर लाखो प्रवासी आपला प्रवास सुसह्य, सुखदपणे करू शकतील आणि हे निश्चित होईल, यात वाद नाही. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर हेही पुढाकार घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या आठवड्यात दोन वेळा मंत्रिमंडळाची बैठक घेऊन सुमारे 38 ऐतिहासिक निर्णय घेतले. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्चाखालच्या दोन्ही सरकारांनी राष्ट्र आणि महाराष्ट्र या दोघांसाठी ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेण्याचे धाडस करून दाखविले.

18 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरळीच्या हॉटेल ब्ल्यू सीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप युतीची आणि लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रितपणे दोन्ही पक्ष लढतील अशी घोषणा करताना नाणार प्रकल्प आणि मुंबई ठाण्यातल्या नागरिकांना 500 चौरस फुटपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून मुक्ती देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे याच आठवड्यात नाणार रद्दची अधिसूचना निघाल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले. राजपत्रात त्याची नोंद झाली आणि मंगळवार, शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकांतून 500 चौ.फुट सदनिकाधारकांना मालमत्ता करातून मुक्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. जे सांगितले ते पूर्ण केले. म्हाडाचे काम झपाट्याने सुरू असून मधु चव्हाण एकेक क्रांतिकारक निर्णय घेत आहेत. त्या निर्णयांना मंत्रिमंडळात मंजुरीची मोहर लगावण्यात येत आहे. सुमारे 10 लाख लोकांना दिलासा देणारा निर्णय घेताना म्हाडाच्या घरांमध्ये अनधिकृत रहिवाशांना अधिक करून बेघर होण्यापासून वाचवण्याचे मदतकार्य देवेंद्र फडणवीस सरकारने केले. इतकेच नव्हे तर ज्या इमारतींना स्वयंपुनर्विकास करायचा आहे त्यांना कर व शुल्कातून सवलत देण्याचा क्रांतिकारी निर्णयही घेण्यात आला. 10 वर्षानंतर ना हरकत दाखला घेण्याची गरज अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागणार नाही.

दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर मेट्रोचे उद्घाटन केले आणि जूनमध्ये दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन करण्यासाठी येण्याचे वचनही पंतप्रधानांनी दिले. ठाण्याचा रिंगरूट मेट्रो रेल्वेला देवेंद्र फडणवीस सरकारने मंजुरी देताना 22 स्थानकांचा यात समावेश करून 13 हजार 95 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला हिरवा कंदिल दिला. आज लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई-ठाण्याकडे-पनवेल-अलिबागकडे लोकांचा ओघ वाढतोय. मागणी आणि पुरवठा यांची सांगड घालून नागरिकांना सुसह्य जीवन जगणे त्यांची वाहतुकीची समस्या, पायाभूत सुविधा या सर्व बाबींकडे पुरेपूर लाभ देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडाकेबाज रीतीने करून दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांच्या संपूर्ण ‘संघाला’ (मंत्रिमंडळाला) यश देवो हीच विनम्र प्रार्थना! ‘सबका साथ सबका विकास’ हे सूत्र घेतले तर ‘अच्छे दिन’ निश्चित येतील.

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply