उरण : वार्ताहर
चिरनेर-गव्हाणफाटा या मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्या ईको गाडीचालकास आपल्या गाडीत सापडलेला सोन्याचा ब्रेसलेट दोन दिवसांनी प्रवाशाला परत दिल्याने बाळकृष्ण मोकल या प्रामाणिक ईको गाडीचालकाचे अभिनंदन होत आहे. चिरनेर गावातील बाळकृष्ण मोकल हा गरीब तरुण आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चिरनेर-गव्हाणफाटा या मार्गावर प्रवाशी वाहतूक करणारी ईको गाडी चालवत आहे. बाळकृष्ण मोकल या चालकास बुधवारी (दि.18) आपल्या गाडीत सोन्याचा ब्रेसलेट सापडला होता. हा ब्रेसलेट सापडल्यानंतर त्यांनी ब्रेसलेट हरविलेल्या प्रवाशाची चौकशी सूरू केली. मात्र काही वेळाने सावंत नावाचा प्रवासी ब्रेसलेट शोधण्यासाठी चौकशी करत असल्याचे समजल्यानंतर बाळकृष्ण मोकल यांनी सोन्याचा ब्रेसलेट आपल्या गाडीत सापडल्याचे त्यांना सांगितले आणि समाधान मोकल यांच्या उपस्थितीत सोन्याचा ब्रेसलेट सावंत यांच्या हातात सूपूर्द केला. बाळकृष्ण मोकल यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.