Monday , February 6 2023

रत्नागिरी, पुणे विजेते

चिपळूण : प्रतिनिधी
यजमान रत्नागिरीने रोमहर्षक लढतीत मुंबई शहरचा 31-28 असा पराभव करून 67व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत प्रथमच पुरुषांचे विजेतेपद पटकावण्याची किमया साधली, तर महिलांमध्ये पुण्याने मुंबई शहरवर 22-20 असा निसटता विजय मिळवत सर्वाधिक 23व्या जेतेपदाला गवसणी घातली.
पवन तलाव मैदानावर झालेल्या महिलांच्या अंतिम लढतीत सायली केरिपाळे, स्नेहल शिंदे आणि दीपिका जोसेफे यांची उणीव पुण्याला अजिबात भासली नाही. आम्रपाली गलांडेच्या एकीकडे पकडी होत असताना अंकिता जगताप, मानसी सावंत आणि पूजा शेलार यांनी पहिल्या सत्रात पुण्याला 15-9 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे हा सामना एकतर्फी होण्याची शक्यता होती, परंतु दुसर्‍या सत्रात पूजा यादव आणि मेघा कदमच्या दमदार चढाया तसेच तेजस्विनी पोटे आणि पौर्णिमा जेधेच्या दिमाखदार पकडींच्या बळावर मुंबईने सामन्यातील रंगत वाढवली, पण पुण्याने आपले जेतेपद निसटू दिले नाही.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासून चुरस होती. रत्नागिरीच्या अजिंक्य पवार वरिष्ठ आणि अजिंक्य पवार कनिष्ठ यांच्या आक्रमक चढायांना मुंबईकडून पंकज मोहिते आणि सुशांत साईल यांच्या चढायांचे चोख प्रत्युत्तर लाभले, परंतु प्रेक्षकांच्या व्यत्ययानंतर सामन्याचे चित्र पालटले आणि रत्नागिरीने सामन्याचे नियंत्रण मिळवताना मध्यंतराला 19-9 अशी आघाडी मिळवली, पण दुसर्‍या सत्रात मुंबईने वेगाने गुण घेत सामन्यात चुरस निर्माण केली. अखेर रत्नागिरीने तीन गुणांच्या फरकाने सामना जिंकत विजयाचा जल्लोष साजरा केला. रत्नागिरीला 2009 आणि 2011मध्ये विजेतेपदाने हुलकावणी दिल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Check Also

सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर …

Leave a Reply