मुंबईकर शार्दुलची विराटकडून मराठीतून स्तुती
मुंबई : प्रतिनिधी
वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या वन डे सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज खेळ करीत मालिकेतही बाजी मारली. विंडीजने विजयासाठी दिलेले 316 धावांचे आव्हान भारतीय संघाने चार गडी राखत पूर्ण केले. कर्णधार विराट कोहली, सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांची अर्धशतके ही भारतीय संघाच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली, परंतु मुंबईकर शार्दुल ठाकूर अंतिम सामन्यात संघासाठी तारणहार ठरला. शार्दुलच्या या खेळीवर कर्णधार विराट
कोहली भलताच खूश झाला आहे.
मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करीत शार्दुलने भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यावरून विराटने आपल्या ट्विटर व इन्टाग्रामवर शार्दुलसोबत एक फोटो टाकत तुला मानलं रे ठाकूर! अशी मराठीतून कॅप्शन देत त्याचे कौतुक केले.
चांगल्या सुरुवातीनंतर अखेरच्या सामन्यात भारताची मधली फळी पुरती कोलमडली. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केदार जाधव झटपट माघारी परतले, पण कर्णधार विराटने रवींद्र जडेजाच्या साथीने एक बाजू लावून धरत भारताला विजयाच्या जवळ नेले, मात्र विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना कोहली 85 धावांवर बाद झाला. यामुळे भारत सामना गमावतो की काय असे चित्र निर्माण झाले होते.
अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूरने मैदानात उतरताच आपल्या खडूस फटकेबाजीचे प्रदर्शन करीत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलवले. शार्दुलने 6 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 17 धावा केल्या.