पनवेल : रामप्रहर वृत्त
न्यू होरायजन पब्लिक स्कूल आणि पेंग्विन किड्स, पनवेल या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी (दि. 19) व शुक्रवारी (दि. 20) झाले. ’निरंतर’ असे या सोहळ्याचे नामकरण करण्यात आले होते. या सोहळ्याला संस्थेच्या संस्थापक विश्वस्त सुवरा बॅनर्जी तसेच खजिनदार श्रीजीत भट्टाचार्य यांची उपस्थिती होती. संस्थेच्या नवी मुंबईतील विविध शाळांचे प्राचार्य, उपप्राचार्य व अनेक मान्यवरही कार्यक्रमाला उपस्थित होते.
’युगांतर द चेन्ज’च्या अलौकिक यशानंतर या कलियुगात घडणार्या विविध घडामोडींचा आधार घेत आजही आढळणारे परमेश्वराचे अस्तित्व, काळानुसार होणारे परिवर्तन, राक्षसी वृत्तीचा संहार आणि सुखमय हर्षभरित असे अद्भुतरम्य प्रदर्शन ’निरंतर’ या दिमाखदार सोहळ्यात पाहायला मिळाले. देवाचे अस्तित्व, निसर्ग, आई आणि मुलांमधील स्नेहाचे संबंध, कुटुंब, मैत्री, समाज, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते तसेच देशाप्रति असणारा अभिमान या कधीही खंड न पडणार्या विविध विषयांवर सुंदर गाण्यांद्वारे विद्यार्थ्यांनी या वेळी उत्कृष्ट सादरीकरण केले, तसेच मूकाभिनय आणि संगीत एकांकिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी ’निरंतर’ या विषयाला अनुसरून सुंदर पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती, तसेच पीपीटी सादरीकरणामुळे प्रेक्षकांना कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला.
गुरुवारी पूर्व प्राथमिक विभाग इयत्ता पहिली व दुसरीच्या सुमारे 1300 विद्यार्थ्यांनी तसेच शुक्रवारी इयत्ता तिसरी ते अकरावीचे सुमारे 1400 विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या दोन्ही दिवशी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रार्थना गीत व सुस्वागतम गीतानंतर सुरांच्या संगीतमय मैफलीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह म्हणून तुळशीचे सुरेख रोपटे देण्यात आले. इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले. पालकांनी व प्रमुख पाहुण्यांनी या भव्यदिव्य व अविस्मरणीय कार्यक्रमाची प्रशंसा
केली. विद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत बुक्कावर यांच्या नेतृत्वामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.