उरण ः प्रतिनिधी
द्रोणागिरी महोत्सवात सोमवारी (दि. 23) रात्री पूर्ण जिल्ह्यातून आलेल्या शरीरसौष्ठव खेळाडूंनी आपले कसब पणाला लावत स्पर्धा रंगतदार व चुरशीची केली. या स्पर्धेत द्रोणागिरी श्रीचा मानकरी ठरला तो पेणचा नितेश पाटील व तोच स्पर्धेतील उत्कृष्ट पोझरही ठरला. त्याचबरोबर कोप्रोली जिमचा विक्रांत पाटील द्रोणागिरी उदय श्रीचा मानकरी ठरला, तर द्रोणागिरी फिजिक्सचा मान पावर हाऊस जिम उरणच्या जितेंद्र पाटीलने पटकावला.
द्रोणागिरी महोत्सवातील दिवस गाजला तो स्लो सायकलिंग, कबड्डी व शरीरसौष्ठवच्या स्पर्धांनी, तसेच गायन स्पर्धाही उत्साहात पार पडली. स्लो सायकलिंग हा क्रीडा प्रकार तोल व संयम यांचा मिलाफ असून या स्पर्धेत 14 वर्षांखालील शालेय गटात शेख शहनवाज प्रथम, तर नहुश म्हात्रे हा द्वितीय आला, खुल्या गटात जुबेर खान प्रथम व जगदिप म्हात्रे द्वितीय आला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून आपापल्या गटातील उत्कृष्ट असे 69 शरीरसौष्ठव खेळाडू आले होते. या खेळाडूंनी कसरत करून तयार केलेल्या आपल्या शरीराचे दर्शन खेळाच्या माध्यमातून सादर केले. त्यात पेणमधील नितेश पाटील हा द्रोणागिरी रायगड श्री 2019 ठरला. विजेत्यांना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, सचिव दिलीप तांडेल, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, ब्रिथ ह्युमैनीटी फाऊंडेशनचे रोहन घरत यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.