मिनीट्रेनची शटल सेवाही लवकरच होणार सुरू
कर्जत : प्रतिनिधी
जून महिन्यात बंद केल्यानंतर माथेरानची राणी बुधवारी (दि. 25) पहिल्यांदाच पुन्हा धावली. नेरळ-माथेरान-नेरळ नॅरोगेज मार्ग पावसाळ्यात झालेल्या भुस्खलनामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी माथेरान स्थानकात थांबवून ठेवलेली मिनीट्रेन बुधवारी नाताळच्या दिवशी नेरळ येथे लोकांमध्ये पाठवण्यात आली. दरम्यान, मिनीट्रेनचा सहा महिन्यानंतरचा प्रवास सुरक्षित झाल्याने कदाचित या आठवड्यात मिनीट्रेनची अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माथेरान-नेरळ मिनीट्रेनच्या नॅरोगेज मार्गाची गेल्या जुन महिन्यातील अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात वाताहत झाली होती तर काही ठिकाणी रेल्वे रुळावर दरडीचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही रेल्वेसेवा अनिच्छित काळासाठी बंद केली होती. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करत मध्य रेल्वेने नियोजित वेळापत्रक प्रमाणे माथेरान स्थानकातील दोन इंजिन आणि आठ बोगी बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नेरळला रवाना केली. या वेळी रेल्वेच्या कल्याण विभागातील इंजिनिअरिंग विभागाचे अधिकारी वाय. पी. सिंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिनीट्रेनच्या इंजिनला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी माथेरान स्थानकातील कर्मचार्यांनी आनंदोत्सव साजरा करत मिठाई वाटली. नॅरोगेज मार्गावरून धावणार्या मिनीट्रेनने बुधवारी आपला प्रवास धीम्या गतीने केला. माथेरान स्थानकातून निघालेली ही माथेरानची राणी पोपटी रंगाच्या डब्यांनी गर्द हिरवाईमध्ये थाटात पावले पुढे टाकत होती. माथेरान स्थानकातून दुपारी एक वाजता निघालेली माथेरान राणी चार वाजता जुम्मापट्टी तर सायंकाळी पाच वाजता नेरळ स्थानकात पोहचली.
नवीन वर्षात मिनीट्रेनमधून प्रवास करण्याची संधी
मिनीट्रेनचा आजचा माथेरान-नेरळ प्रवास सुरक्षित झाल्याने 26 किंवा 27 डिसेंबर रोजी मिनिट्रेनची शटल सेवा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासन काही निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिनीट्रेनची अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरू झाल्यास नाताळची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या तसेच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना लाडक्या मिनीट्रेनमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्यातून माथेरानचा पर्यटन व्यवसायदेखील वाढण्यास मदत होणार आहे.