Breaking News

‘माथेरानची राणी’ डौलाने धावली

शटल सेवेला पर्यटकांचा जबरदस्त प्रतिसाद

कर्जत : बातमीदार
देशी-विदेशी आबालवृद्ध पर्यटकांचे आकर्षण असलेली आणि गेले पाच महिने यार्डात विश्रांती घेतलेली माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेन पर्यटकांच्या दिमतीला पुन्हा एकदा रूळावर आली आहे. या रेल्वेची अमन लॉज ते माथेरान शटल सेवा शुक्रवारी (दि. 28)सुरू झाली आणि दिवसातून आठ अप आणि आठ डाऊन अशा फेर्‍या होऊन पहिल्याच दिवशी पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
माथेरानची अस्मिता असलेली मिनीट्रेन दोन दिवसांच्या यशस्वी चाचणीनंतर पर्यटकांना घेऊन धावली. मिनीट्रेन सुरू होणार असल्याने पर्यटकांनी रेल्वेस्थानकात गर्दी केली होती. सकाळी 8.15 वाजता माथेरान स्थानकातून पर्यटकांना घेऊन पहिली शटल निघाली. दरवेळी ही गाडी आठ बोगींची असते, आता मात्र ती सहा बोगींची आहे. असे असले तरी दिवसभरात 781 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे एक लाख 16 हजार 340 रुपयांचे उत्पन्न मध्य रेल्वेला पहिल्याच दिवशी मिळाले आहे.
अतिवृष्टी, तसेच बंद असलेली मिनीट्रेनमुळे गेले पाच महिने पर्यटकांनी माथेरानकडे अक्षरशः पाठ फिरविली होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय डबघाईला आला होता, पण सरत्या वर्षाच्या शेवटी मिनीट्रेनची शटल सेवा सुरू करून मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यटकांसह स्थानिकांना अनोखी भेट दिली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply