विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
मुंबई ः प्रतिनिधी
नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यापासून आम्हाला कुणीच रोखू शकत नाही. जाळपोळ करणार्यांना सरकारकडून परवानगी मिळतेय, परंतु आम्हाला परवानगी नाकारली जाते. राज्यातील सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अशा शब्दांत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपने शुक्रवारी (दि. 27) ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ रॅली आयोजित केली होती, परंतु पोलिसांनी भाजपच्या या रॅलीला परवानगी नाकारली. ऑगस्ट मैदानात झालेल्या सभेत फडणवीस यांनी शिवसेनेसह राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हा कायदा कोणाचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, आम्ही शांतपणे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची परवानगी मागितली होती. ती परवानगी आम्हाला नाकारण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची संमती हे सरकार नाकारत असेल, तर मला टिळकांनी जो प्रश्न विचारला तो विचारावाच लागेल की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही आम्हाला मार्च काढण्यापासून रोखू शकता, पण सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. तुमचे राजकारण संकुचित आहे, खुर्चीचा मोह तुम्हाला आहे त्याच राजकारणातून तुम्ही सीएएविरोधात भूमिका घेत आहात आणि देश पेटवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
कुठल्याही धर्माच्या लोकांना आपल्या देशात जागा देऊन, त्यांच्या धर्माचा सन्मान करणारा भारत हा एकमेव देश आहे याचा तुम्हाला विसर पडला का? पाकिस्तान, बांगलादेश यामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले ते या संकुचित लोकांना दिसत नाही का? अशा प्रश्नांच्या फैरी या वेळी फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला उद्देशून झाडल्या. या वेळी त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. कालपर्यंत शिवसेना देशातील बांगलादेशींना बाहेर काढण्याची भाषा बोलत होती, मात्र आता सत्ता आल्यामुळे त्यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे. सत्ता येईल जाईल, पण हा देश राहिला पाहिजे. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही सत्तेला लाथ मारून निघून जाऊ, पण देश वाचवू, असेही ते म्हणाले.
आपली खुर्ची वाचवण्यासाठी काही जण सावरकरांचा अपमानपण सहन करतात. सावकार कबर खोदण्याची औकात कुठे आहे. हिंदूंची कबर कुणी खोदू शकत नाही. ज्यांनी आमच्यावर आक्रमण केले आम्ही त्यांना सोडले नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरे आहोत असे सांगून आग लावून, भारतात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न ते करतील, तर समर्थनाथही खूप लोक उतरतील. इतके की मुंगीपण जाऊ शकणार नाही. आता लढाई सुरू झाली आहे, असे फडणवीस गरजले.