Monday , January 30 2023
Breaking News

आमच्या जमिनी परत करा!, खारेपाटातील शेतकर्यांचे लाक्षणिक उपोषण

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्याच्या खारेपाट परिसरातील जमिनी खाजगी प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर मागील अनेक वर्षांपासून या प्रकल्पांची वीटही उभी राहिली नाही. त्यामुळे या जमिनी आम्हाला परत करा, अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. श्री शिवछत्रपती शेतकरी संघटना आणि हाशिवरे खारेपाट विभागातील शेतकर्‍यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

अलिबागच्या खारेपाटातील हाशिवरे, रामकोठा, सोनकोठा, शिरवली, बहिरीचा पाडा, मानकुले, नारंगीचा टेप, रांजणखार, नारंगी, फोफेरी आणि वाघ्रण या भागातील शेती समुद्राचे खारे पाणी शिरल्याने नापिक झाली. गेली 25 वर्षे येथील शेतात एक दाणाही पिकला नाही. दरम्यानच्या काळात या भागातील जमिनी शेतकर्‍यांनी विविध खाजगी प्रकल्पांसाठी विकल्या. परशुराम पुरिया तसेच रेवस पोर्ट लि. या कंपन्यांनी या जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या. परंतु ज्या प्रयोजनासाठी किंवा प्रकल्पांसाठी या जमिनी संपादित केल्या होत्या, त्यांचे काम अद्यापही सुरू झालेले नाही.

भूसंपादन कायद्यानुसार प्रकल्पांसाठी जमिनी खरेदी केलयानंतर सात वर्षांच्या कालावधीत तिचा औद्योगिक वापर करता येईल. तसे न केल्यास या जमिनी संबंधित मूळ मालकांना परत करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून विनावापर पडून असलेल्या जमिनी शेतकर्‍यांना परत मिळाव्यात अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. शेतकर्‍यांनी याबाबत यापूर्वीही सरकारदरबारी पाठपुरावा केला होता. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी, जर संपादित जमिनी विकसीत केल्या नसतील तर त्या पुन्हा शेतकर्‍यांच्या नावे कराव्यात तसेच सातबारा उतार्‍यावरून संबंधित कंपन्यांची नावे कमी करावीत, अशा सूचना महसूल प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने हे उपोषण करावे लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. श्री शिवछत्रपती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय गावंड, सचिव सुनील म्हात्रे, उपसचिव अनंत डाकी, सुतेंद्र ठाकूर, सुमती म्हात्रे, रमेश म्हात्रे, माजी संभापती कुंदा गावंड, शैला पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply