कडाव : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील किरवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बामणोली येथील शासकीय गुरचरण जागेत मोठ्या प्रमाणात उत्खनन करुन एका धनिकाच्या खाजगी जागेवर मातीचा भराव टाकला आहे. त्यामुळे तेथील आदिवासी बांधवांची स्मशानभूमी उध्वस्त झाली असल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
मुंबईतील अब्दुल वाहित अब्दुल अजीज खान, रियाज अहमद जूलफन अली अन्सारी आणि सईदुद्दीन हमीदुद्दीन खान या धनिकांनी बामणोली येथील सर्व्हे नंबर 1/10/अ ही खाजगी जमीन खरेदी केली असून, त्यानी आपल्या जमिनींत भराव करण्यासाठी काही ग्रामस्थांच्या संगनमताने शासकीय गुरचरण (सर्व्हे नंबर 5/2) असलेल्या जागेत जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु केले आहे. त्याला येथील आदिवासी बांधवांनी प्रचंड विरोध केला. त्यांनी कर्जत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, आदिवासी विकास मंत्रालय आणि महसूल विभाग यांना निवेदने देवून याप्रकरणी तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बामणोली आदिवासीवाडीच्या सदर शासकीय गुरचरण जागेचा वापर बाल दफनविधीसाठी केला जात आहे. मात्र काही धनिकानी आपल्या शेतजमिनीत भराव करण्यासाठी या शासकीय गुरचरण जागेत उत्खनन सुरु केले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना पुढील परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
-दिलीप पवार, ग्रामस्थ,
बामणोली आदिवासी वाडी
किरवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बामणोली येथील शासकीय गुरचरण जागेवर जे उत्खनन झाले आहे, त्याची पाहणी करुन संबंधीत दोषींवर कारवाई केली जाईल. ज्यांनी या मातीचा भराव आपल्या खाजगी जागेत केला आहे, त्याचीही सविस्तर चौकशी करुन कारवाई केली जाईल. -विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत