अलिबाग : प्रतिनिधी
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांना पसंती मिळत आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर रायगडात येण्यास सुरुवात झाल्याने जवळपास सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाले आहेत.
थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोव्यापाठोपाठ रायगड जिल्हा पर्यटकांचे फेव्हरिट डेस्टिनेशन आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी 31 डिसेंबरला पर्यटक मोठ्या संख्येने रायगडात येत असतात. यंदादेखील पर्यटक आले आहेत. त्यामुळे हॉटेल्स बूक झाली आहेत.
पर्यटकांच्या सेलिब्रेशनसाठी हॉटेल व्यावसायिकांनी जोरदार तयारी केली आहे. पर्यटकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लहान मुलांसाठी गेम झोन आहे. शाकाहारी व मांसाहारी जेवण, थर्टी फर्स्टच्या रात्री सामुदायिक भोजन, डीजे पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत. अनलिमिटेड डिनर व अनलिमिटेड ड्रिंक्स अशा ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत.
मांडवा, आवास, किहिम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, काशिद, मुरूड, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या समुद्रकिनार्यांवरील हॉटेल व कॉटेजेसचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. पर्यटक घरगुती जेवणाला पसंती देत आहेत. त्यामुळे खानवळवाल्यांनाही चांगले उत्पन्न मिळत आहे.
कडक पोलीस बंदोबस्त तैनात
रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे व माथेरान येथे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 12 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 70 पोलीस कर्मचारी, 44 महिला पोलीस कर्मचारी, 85 वाहतूक पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 23 जवान, 1 स्ट्रायकींग फोर्स असा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …