Breaking News

एसटी कर्मचार्‍यांना लसीकरणात प्राधान्य द्यावे; प्रवासी संघटनेची मागणी

म्हसळा ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटकाळात परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यासाठी विशेष एसटी बसेसची सुविधा पुरविणारे रायगड विभागातील कोरोना योद्धे एसटी चालक-वाहकांसह कर्मचार्‍यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी श्रीवर्धन-म्हसळा प्रवासी संघटनेचे अनिल महामूनकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब व रायगडच्या पालकमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू आहे. त्यात पोलीस दलातील कर्मचारी, महसूल विभाग व जिल्हा परिषदेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. कोरोना योद्धा म्हणून या प्रत्येक विभागाच्या कर्मचार्‍यांची नोंदणी करण्यात येऊन त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोना काळात रायगड (पेण) विभागातील कर्जत, पेण, अलिबाग, मुरूड, रोहा, माणगाव, महाड, श्रीवर्धन या आगारांतून लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजुरांना 1560 गाड्यांनी त्यांच्या मूळगावी सुखरूप पोहचविण्यात आले. कोरोना काळात प्रवाशांच्या सोयीसाठी लोकलसेवेला पर्याय म्हणून बेस्ट बसेसच्या माध्यमातून बसफेर्‍यांद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. बेस्ट बसेसवर पडणारा ताण व कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे विविध आगारांतून कर्मचारी मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी गेले होते. याच कालावधीत वाहतुकीसाठी रायगड विभागातून 70 गाड्यांची मदत करण्यात आली. रायगड विभागात एकूण 2380 कर्मचारी आहेत. त्या अनुषंगाने एसटी बस चालक-वाहकांचा प्रत्येक प्रवाशाशी थेट संपर्क येत असूनही चालक-वाहकांना लस दिली गेली नाही. लसीकरणासंदर्भात नियोजन करणार्‍या यंत्रणेने याबाबत सारासार विचार करून एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांना लस द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

राज्यातील अनेक चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या चालक-वाहकांचा 50 लाखांचा विमा उतरविण्यात यावा.

-अनिल महामूनकर, प्रवासी संघटना, श्रीवर्धन-म्हसळा

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply