नवी मुंबई : बातमीदार – नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी व रिसर्च सेन्टरतर्फे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्त नागरिकांना योगसाधनेचे धडे देण्यात येत आहे. कोरोनाला दूर सारण्यासाठी रोग प्रतिकारक क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे हेच ओळखून डॉ. स्वामी योगप्रताप व डॉ. दीपा काला यांनी कोरोना झालेल्या रुग्णांना बेडवर बसवून योग प्रशिक्षण देत आहेत.
कोरोना झाल्यामुळे मनावर आलेला ताणतणाव यामुळे कमी होण्यास मदत होत आहे. तसेच श्वसनसंस्था अधिक बळकट करण्यासाठी त्यांना फुग्यामध्ये हवा भरणे, बसल्या जागेवरून प्राणायाम व सोपी योगासने त्यांना शिकविण्यात येत आहेत. ओंकार, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रमर, कपालभाती, भसरीका या योगप्रकारांची त्यांना योग्य माहिती
देण्यात येते.
जेव्हा हे रुग्ण घरी जातील तेव्हा त्यांना या योग प्रशिक्षणाचा नक्कीच उपयोग होईल कारण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक योगसाधना केंद्रे तसेच जीम बंद राहणार आहेत. कोरोना लगेच संपणार नाही. काही वर्ष तो आपल्याबरोबर राहणार आहे. परंतु नक्कीच तो सौम्य होत जाणार आहे. त्याच्याशी सतत लढण्यासाठी आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी लागणार आहे व त्यासाठी योगसाधना आत्मसात करणे गरजेचे आहे असे मत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या
स्त्रीरोगतज्ञ डॉ. दीपा काला यांनी व्यक्त केले.
सौम्य लक्षणे असणार्या पॉजिटीव्ह रुग्णांना योगाचे महत्त्व पटवून देत घरी गेल्यावर दररोज योगा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. योगा शिकवताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर पीपीई कीट परिधान करून व फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळत आहेत.