कर्जत : प्रतिनिधी
नांदेडहून पनवेलला सकाळी 9 वाजता येणारी एक्स्प्रेस गाडी संध्याकाळी 4च्या सुमारास पुन्हा नांदेडकडे निघते. या मधल्या 7 तासांत या गाडीची पनवेल-कर्जत-पनवेल अशी शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी केली असता या गाडीच्या रेग्युलर मेन्टेनन्ससाठी तीन तास लागतात, असे कारण देऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नकार घंटा सुरू केल्याने प्रवासी वर्ग नाराज झाला आहे. नांदेड-पनवेल ही गाडी दुपारच्या वेळेमध्ये पनवेल-कर्जत-पनवेल अशी सुरू करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती, पण नांदेड-पनवेल गाडीला सकाळी 9 ते 4 वाजण्याच्या दरम्यान पनवेल-कर्जत-पनवेल अशी सुरू करणे शक्य नाही कारण कर्जत-पनवेल या भागात याच वेळेला तीन तासांचा रेग्युलर मेन्टेनन्स असतो, असे रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना कळविले आहे. खरे तर ही गाडी पनवेलला सकाळी 9 वाजता पोहचते व परत दुपारी 4 वाजता पनवेलहून नांदेडसाठी रवाना होते. म्हणजेच जवळ जवळ 7 तास ही गाडी पनवेलला उभी असते. या वेळेदरम्यान पनवेल-कर्जत-पनवेल अशी एक फेरी केली, तर त्याचा फायदा बर्याच प्रवाशांना होऊ शकेल व रेल्वेचे उत्पन्नसुद्धा वाढू शकेल. रेल्वे प्रशासनाने सात तासातील तीन तास रेग्युलर मेन्टेनन्ससाठी घेतले तरी उर्वरित चार तासांत पनवेल-कर्जत-पनवेल अशी फेरी होऊ शकते. कारण या फेरीला केवळ दीड ते पावणे दोन तास लागू शकतात. त्यामुळे या मागणीचा पुनर्विचार करावा, अशी विनंती ओसवाल यांनी केली आहे.