Breaking News

पनवेलकरांनी केले नववर्षाचे स्वागत जल्लोषात, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

पनवेल : वार्ताहर

नववर्षाचे स्वागत दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलकरांनी जल्लोषात केले असले तरी बाजारपेठेत मंदीचा फटका या जल्लोषात दिसून आला. त्यातच हॉटेल पहाटे पर्यंत तर वाईन शॉप एक वाजेपर्यंत आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले असले तरी त्यांना प्रतिसाद लाभला नाही. नाक्यानाक्यावर असलेला पोलीस बंदोबस्त व ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमुळे अनेकांनी वेळीच घरी जाणे पसंत केले.

पनवेलकरांनी यंदाही नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले. मावळत्या वर्षाला निरोप देतानाच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई उत्साहात दिसून येत होती. दरवेळेप्रमाणे यंदाही वेगवेगळी हॉटेलस्, बार रेस्टॉरंन्ट, मॉल, ढाबे, फार्म हाऊस या ठिकाणी गर्दी होती. अनेकांनी नववर्षाचे स्वागत सहकुटुंब केले. अनेक नामवंत हॉटेलमध्ये या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनलिमिटेड फुडस् काही ठिकाणी शीतपेये मोफत, डी. जे., डान्स सह विविध करमणुकीचे कार्यक्रम यानिमित्ताने ठेवण्यात आले होते. परंतु यंदाच्या वर्षी त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. हॉटेल, बार व वाईन शॉप मध्यरात्री पर्यंत उघडे असतानाही त्या ठिकाणी ग्राहकांची तुरळक गर्दी दिसली. तर या वाढीव वेळेमुळे पोलिसांना नाहक ताण सहन करावा लागला व बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पोलिसांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून येत होते.

वाहतूक शाखेतर्फे पनवेल शहर महामार्ग, पळस्पे, कळंबोली सर्कल, खारघर, मुंबई-गोवा महामार्ग आदी ठिकाणी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या कारवाई अंतर्गत काही वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. या पोलीस बंदोबस्तामुळे अनेकांनी आपल्या सोसायटीत किंवा घरामध्येच नववर्षाचे स्वागत करण्याचे पसंत केले. रात्रीच्या ठिक 12 वाजता फटाक्यांच्या आतषबाजी जोरदारपणे करण्यात आली होती. तर अनेकांनी आपल्या सोसायट्यांना नेत्रदिपकाची रोषणाई केली होती. काही सामाजिक संस्थेच्या मार्फत द दारुचा नव्हे तर दुधाचा या अंतर्गत मोफत दुधाचे वाटप करून तसेच पोलिसांना चिक्कीचे वाटप करून आगळा वेगळा उपक्रम त्यांनी राबविला होता.

तर सुकापूर येथील दे धक्का ग्रुपने प्रबोधनात्मक संदेश देणारा देखावा सादर केला होता. अनेक ठिकाणी नववर्षाचे स्वागत जल्लोषात झाले असले तरी पुर्वीच्या उत्साहात कुठेतरी कमतरता दिसून येत होती. असे असले तरी पनवेल परिसरात किरकोळ वाद वगळता कोणतीही मोठी दुर्घटना किंवा घटना घडली नसल्याने पोलिसांनी पहाटे सुटकेचा निश्वास टाकला.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply