औद्योगिक विभागाची धडक कारवाई
कळंबोली : प्रतिनिधी
तळोजा औद्योगिक विभागातील शेकडो अनधिकृत बांधकावर औद्योगिक विभागाने धडक कारवाई करत शेकडोच्यांवर बांधकामे गुरूवारी (दि. 2) जमिनदोस्त केली. या कारवाईमुळे स्थानिक गावकर्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तळोजा औद्योगिक विभागाचे उपाअभियंता राजेंद्र बेलगामवार यांनी तळोजा औद्योगिक विभागातील अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्याचा संकल्पच केला आहे. याची माहिती गावकर्यांना मिळाली. तेव्हा गावकर्यांची बांधकामे हटविण्यात येवू नये म्हणुन तळोजा औद्योगिक विभाग कार्यालयावर काही आठवड्यांपूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने धडक दिली होती. त्यावेळी कंपन्यांसाठी ज्या शेतकर्यांच्या जमीनी दिल्या आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांची बांधकामे जमिनदोस्त करण्यात येवू नये अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तळोजा एमआयडीसीचे उपअभियंता राजेंद्र बेलगामवार यांनी मागणी मान्य केली होती. असे असताना तोंडरेफाटा परिसरातील शेकडो अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात आल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. तळोजा औद्योगिक विभागातील नावडे फाटा ते आयजीपीएल कंपनी दरम्यानची मोकळे भूखंड व रस्त्यावरील अतिक्रमणे निष्कासन करण्याची मोहीम हाती घेतली. मोकळ्या भुखंडावर भंगार, गॅरेजचे धंदे सुरु केल्याने यात सिलेंडर, केमिकलचा स्फोट होवून जिवितहानी होण्यापूर्वी एमआयडीसीने सावध भूमिका घेतली आहे. रस्त्यावर अतिक्रमण करुन रहदारीला अडथळा करणार्या अनधिकृत टपर्या, गॅरेजेस, बेकायदा भाडे वसूल करणारी शेड, हॉटेल अशी दोन्ही बाजूची सुमारे शेकडोच्यांवर अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. अतिक्रमणे केल्यामुळे ट्रॅफिक जॅम होणे, आग लागणे, अपघात होणे अशा समस्या वाढत आहेत.
अनधिकृत बांधकामावर वेळोवेळी कारवाई करून सुद्धा बांधकामे केली जात आहेत. अनधिकृत बांधकामामध्ये अनेक बेकायदा धंदे चालत आहेत त्यात गॅरेजचा जास्त भरणा आहे. त्यात चोरीचेही प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. याचा त्रास नाहक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर वेळोवेळी कारवाई केली जाणार आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहील.
-राजेंद्र बेलगामवार, उपअभियंता, औद्योगिक विभाग, तळोजा