पाली ः प्रतिनिधी
शिहू बेणसे विभागातील मुंढाणी गावचे सुपुत्र, भारतीय सैनिक तथा जे. जे. पाटील सर यांचे शिष्य असलेल्या मंगेश नामदेव घासे यांची स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडियामार्फत (पटियाला) येथे होणार्या एन. आय. एस. कबड्डी कोच कोर्ससाठी निवड झाली आहे. मंगेश घासे श्री गावदेवी क्रीडा मंडळ संघाचा उत्कृष्ट व नावाजलेला खेळाडू आहे.
मंगेशच्या नेतृत्वात गावदेवी संघाने अनेक सामने जिंकून विविध पारितोषिके मिळवली आहेत. मंगेश घासे यांची विशेष कोर्ससाठी निवड होताच त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मंगेश घासे हे भारतमातेच्या सेवेबरोबरच क्रीडा जगतातदेखील देदीप्यमान अशी कारकीर्द गाजवत गाव, विभाग व जिल्ह्याचा नावलौकिक करीत असल्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे जे. जे. पाटील यांनी म्हटले आहे. सदर कोर्स एस. आर. एम. युनिव्हर्सिटी, एस. आर. एम. नगर, कांचीपुरम (तामिळनाडू) येथे 24 डिसेंबर ते 31 जानेवारी 2020 यादरम्यान होणार आहे.