निवेदिका अनघा मोडक यांचे प्रतिपादन, सिडकोमध्ये महिला दिन
बेलापूर : रामप्रहर वृत्त : स्त्रियांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य समरसून जगण्याची क्षमता प्राप्त केली, तर जीवनात केवळ आनंद आणि आनंदच असेल, असे उद्गार सुप्रसिद्ध निवेदिका व रेडीओ जॉकी अनघा मोडक यांनी काढले. सिडको भवन येथे सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त अनघा मोडक यांचा जीना इसीका नाम है (विविध क्षेत्रांतील ध्यासांचा उलगडा) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे, व्यवस्थापक (कार्मिक) विद्या तांबवे, व्यवस्थापक (पुनर्वसन) मार्गजा किल्लेकर, अतिरिक्त मुख्य वास्तुशास्त्रज्ञ रेखा धर, सिडको एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष नीलेश तांडेल, सरचिटणीस जे. टी. पाटील, सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन अध्यक्ष मिलिंद बागुल हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले. अनघा मोडक पुढे म्हणाल्या की, आजारपणात दृष्टी गमावल्यानंतर ही स्वतःच्या अंतरंगात डोकावून बघण्याची संधी असल्याचे मानून आपण प्रत्येक क्षण आनंदाने जगलो, असे आपल्या संघर्षाबद्दल बोलताना त्या सांगत होत्या. दूरचित्रवाणीसारख्या दृक्-श्राव्य माध्यमात निवेदिका म्हणून काम करताना हा सकारात्मक दृष्टिकोनच आपल्या कामी आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यातील शारीरिक उणिवांवर मात करत यश प्राप्त केलेल्या व समाजासाठी काम करणार्या काही व्यक्तींबद्दलचे प्रेरणादायी किस्सेही अनघा मोडक यांनी या वेळी सांगितले. अशोक शिनगारे यांनी आई, बहीण, पत्नी आणि मुलगी हे कुटुंबाचे व पर्यायाने समाजाचे स्तंभ असल्याचे उद्गार काढत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कामगिरीची मोहोर उमटवलेली असली, तरी स्त्री सक्षमीकरण व स्त्री सुरक्षा या मुद्द्यांना प्राधान्य द्यावे लागणार असल्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्या तांबवे यांनी स्त्रियांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आव्हानांना सामोरे गेल्यास संकटे दूर होण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वासही वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन केले. या वेळी मार्च 2019 मध्ये निवृत्त होणार्या शैलजा नाईक, उषा भोईटे, भारती कंटे, आरती कोटेकर, रचना सोनावणे आणि विमल म्हात्रे या महिला कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप अनघा मोडक यांच्या सहकारी साधना यांनी गायलेल्या ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या बोधपर गीताने झाला. सूत्रसंचालन अनिता उरणकर, तर आभार सुलोचना कडू यांनी मानले.स्त्री-पुरुष अशी तुलना करण्यापेक्षा एक सुसंस्कृत माणूस होऊन जगणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत स्त्रियांनी स्वतःसाठीही जगावे, आपल्याला काय मिळाले नाही, त्यापेक्षा काय लाभले आहे त्याचा विचार करा, संकटांचे स्वागत करून संकंटांचे रूपांतर संधींमध्ये करा.
-अनघा मोडक, निवेदिका