Breaking News

‘भुरी’मुळे आंबा पीक काळवंडणार

हवामानातील बदलामुळे मोहरावरील कीडरोगाची बागायतदारांना धास्ती

माणगाव : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापासून हवामानातील सततच्या बदलामुळे आंबा पिकाच्या मोहरावर कीडरोग पडून त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आंबापीक काळवंडणार असल्याची भीती बागायतदार शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. माणगाव तालुक्यात सुमारे सातशे नऊ हेक्टर क्षेत्र आंबा बागायतीचे आहे. तर रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतीचे उत्पादन देणारे क्षेत्र नऊ हजार सातशे पंचाहत्तर हेक्टर आहे. सध्या आंबा पिकाला फुलोरा येणे सुरु झाले आहे. काही ठिकाणी मोहर आला आहे, तर काही ठिकाणी कैर्‍या लागल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून हवामानात व वातावरणात होणार्‍या सततच्या बदलामुळे आंबा पिकावर मावा व धुक्यामुळे बुरशी पडू लागली आहे. मावा किडीमुळे रोग फैलावतो. त्या रोगामुळे फुलोरा कोमेजून जातो. या रोगांशी सामना करण्यासाठी कृषीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कीटकनाशक औषधे फवारणीच्या कामाला लागले आहेत.  माणगाव कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बदलत्या वातावरणामुळे आंबा पिकावर कीडरोग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मोहराचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक औषधांची फवारणी करावी.   तसेच मोहर येण्यापूर्वी खोड, फांद्या व शेंड्यावर सायपर मेथ्रीन 25 टक्के प्रवाही किंवा फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही किंवा डेकमेथ्रीन दोन टक्के प्रवाही अशी फवारणी संपूर्ण झाडावर करावी. या फवारणीसोबत पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम कार्बेन्डझिम मिसळावे. यामुळे भुरी करपा रोगाचे नियंत्रण होईल. कीटनाशकाची तिसरी फवारणी मोहर फुलण्यापूर्वी झमीडक्लोप्रिड 17 टक्के तीन मिली पाण्यात मिसळून तिसर्‍या-चौथ्या फवारणीसाठी कीटकनाशकाच्या द्रवणामध्ये आवश्यकतेनुसार भुरी रोग नियंत्रणासाठी 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा दहा ग्राम कार्बेन्डझिम किंवा पाच मिली हेक्झकोनझोल मिसळावे. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी अधिकारी तसेच कृषीतज्ज्ञांकडे संपर्क करावा, असे आवाहन माणगाव कृषी अधिकार्‍यांनी केले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply