Monday , February 6 2023

महाविकास आघाडीत महानाराजी

आमदार अनिल बाबर सरकारच्या कामावर नाराज

सांगली : प्रतिनिधी

ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यापासून महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळू लागली आहे. त्यात शिवसेनेचे सांगलीमधील खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांची भर पडली आहे. बाबर पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या नाराजीबाबत बाबर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, मंत्रीपद न मिळाल्याने नव्हे तर मी सरकारच्या कामावर नाराज आहे. त्यामुळे मी आता कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपदसुद्धा घेणार नाही. बाबर म्हणाले की, मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही आणि मी राजीनामादेखील देणार नाही, पण माझी नाराजी ही सरकारच्या कामाच्या बाबतीत आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला तरी अजून मंत्रीपदांचा आणि खातेवाटपाचा घोळ सुरू आहे. पण जे खाते मिळेल ते घेऊन जास्त रस्सीखेच न करता तिन्ही पक्षांनी आता लोकांची कामे सुरू करावीत. असा घरचा आहेर खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. विटा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद मिळणार अशी दाट शक्यता अंतिम क्षणापर्यंत होती. मात्र त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे आमदार बाबर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल बाबर राजीनामा देणार, अशी जोरदार चर्चा सुरु होती. तर कार्यकर्त्यांकडूनही बाबर यांच्यावर दबाव निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर अनिल बाबर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाबर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीपद आणि खाते वाटपावरुन सुरू असलेल्या घोळाच्या पार्श्वभूमीवर सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आमदार संदीप क्षीरसागर जि. प. निवडणुकीपासून अलिप्त

बीड : प्रतिनिधी

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे काही अलबेल आहे का? असा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर उपस्थित होऊ लागला आहे. चार दिवसांपूर्वी नाराज असणार्‍या आमदार प्रकाश सोळंके यांची मनधरणी करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे यांना पुढाकार घ्यावा लागला. त्यांचे बंड शांत होत नाही तोच आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हेदेखील जिल्हा परिषद निवडणुकीत डावलल्यामुळे पक्षावर नाराज असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बीड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या शिरसाट यांची तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व सूत्र मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दिली होती. त्यांनी दहा-बारा दिवसांपासून राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांना अज्ञात स्थळी ठेवले होते. बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे या पदासाठी संदीप क्षीरसागर यांच्या आईच्या नावाची चर्चा होती. दरम्यान, पुन्हा एकदा अध्यक्षपद आपल्याला हुलकावणी देणार, अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर संदीप क्षीरसागर हे या संपूर्ण प्रक्रियेपासून दूर राहिले. मंत्री धनंजय मुंडे हे शहरातील एका हॉटेलवर बैठका घेत असताना प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित यांच्यासह अनेक नेते हजर असताना संदीप क्षीरसागर मात्र या बैठकींकडे फिरकले देखील नाहीत. झेडपी निवडणुकीत पक्षाने डावलल्यामुळे संदीप क्षीरसागर हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल नाही, असे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे बीड जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत असताना राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर शहरात असूनही या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व करणार्‍या धनंजय मुंडे यांच्यासमोर गटातटात विखुरलेल्या राष्ट्रवादीला एकसंघ करणे हे मोठे आव्हान धनंजय मुंडे यांच्यासमोर असणार आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply