स्थानिकांचे 20 जानेवारीपासून आमरण उपोषण

कर्जत : बातमीदार
नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने निधी दिला आहे. या निधीमधून करण्यात येणार्या रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. हे काम त्वरीत पुर्ण करावे, यासाठी स्थानिक रहिवासी सुभाष नाईक 20 जानेवारीपासून उपोषण करणार आहेत. तसे पत्र त्यांनी रायगड जिल्हा परिषद आणि नेरळ विकास प्राधिकरणला दिले आहे. एमएमआरडीएकडून मिळालेल्या 22 कोटीच्या निधीमधून नेरळ गावातील आठ रस्त्यांची कामे केली जाणार होती. त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने निविदा काढल्या होत्या. त्यात नेरळ टॅक्सी स्टॅण्डपासून कल्याण रस्त्यावरील दिव्यादिप हॉटेल या खांडा गावातून जाणार्या रस्त्याचा समावेश होता. मात्र या रस्त्याचे काम करणार्या मिरॅकल इंजिनियर कंपनीने काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे तेथे गेली वर्षभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र त्या अर्धवट ठेवण्यात आलेल्या रस्त्याबाबत रायगड जिल्हा परिषद गप्प असल्याने ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा आरोप खांडा ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, दिव्यादिप हॉटेलपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे निविदेत नमूद असतानादेखील 150 मीटर अलीकडेच रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे. खांडा भागातील काम बंद करून किमान दीड वर्षे झाली असून त्याकडे नेरळ विकास प्राधिकरण कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. मात्र रस्त्याचे काम अर्धवट ठेवणार्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा बांधकाम विभागाचा प्रयत्न आहे, त्याची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी खांडा ग्रामस्थ करीत आहे. तर येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष नाईक यांनी आता रस्त्याच्या पूर्णत्वासाठी 20 जानेवारीपासून सहकार्यांसह आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमच्या भागातील दिव्यादीप हॉटेल ते रेल्वे स्टेशन पूल या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे, टेंडरही तसे निघाले आहे. तरीही गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचेे काम अर्धवट स्थितीत आहे. ते त्वरीत पूर्ण करावे, अन्यथा 20 जानेवारीपासून सहकार्यांसह आमरण उपोषण करण्यात येईल.
-सुभाष नाईक, ग्रामस्थ, नेरळ