पनवेल : बातमीदार
दादर (मुंबई) येथील महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठानच्या वतीने अमरकोश पठण स्पर्धा गेली 17 वर्षे आयोजित करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत भाषेची गोडी निर्माण व्हावी, उच्चारण व पाठांतराचे संस्कार व्हावेत या हेतूने प्रामुख्याने ही स्पर्धा दादर, डोंबिवली आणि पनवेल अशा केंद्रांमध्ये भरवण्यात येते. को. ए. सो. पनवेलमधील इंदूबाई वाजेकर विद्यालयात ही स्पर्धा यंदा उत्साहात झाली.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे 300 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. पनवेल, वाशी, अलिबाग, नागोठणे, बदलापूर, पुणे अशा विविध ठिकाणांहून व शाळांतील विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. पनवेल येथे गेली 11 वर्षे ही स्पर्धा होत असून, प्रतिवर्षी पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील शाळांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, ही विशेष बाब असून त्याचे श्रेय संस्कृतप्रेमी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आहे, असे प्रतिष्ठानच्या कार्यवाह तरंगिणी खोत म्हणाल्या.
पनवेल केंद्राच्या प्रमुख म्हणून स्नेहा जुवेकर यांनी चोख कामगिरी बजावली. त्यांना मैथिली निमकर, चित्रा मानकामे, नीरज सावंत, पुष्कर कानिटकर यांची उत्तम साथ लाभली. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे नागोठण्याच्या रिलायन्स फाऊंडेशन स्कूलची इयत्ता दुसरीत शिकणारी विद्यार्थिनी मुग्धा श्रीगजानन वैद्य हिने कै. बा. रा. दीक्षित स्मृती स्पर्धेसाठी निर्धारित असलेल्या अमरकोशाच्या प्रथम कांडातील पहिल्या 150 ओळी खणखणीत आवाज आणि स्पष्ट उच्चारणासह सलगपणे म्हटल्या. वाजेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांच्या सहकार्याचा वाटा या
स्पर्धा यशस्वी करण्यामागे आहे, असे केंद्रीय प्रमुख स्नेहा जुवेकर यांनी सांगितले.