महाड : प्रतिनिधी
कोकण रेल्वेमार्गावरील वीर स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या स्थानकातील फलाटांची आणि छपराची दुरवस्था झाली आहे. छपराचे पत्रे तुटून गेले आहेत, तर फलाटावरील फरशादेखील उखडून गेल्या आहेत.
महाडपासून सात किमी अंतरावर असलेल्या वीर स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी सध्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण सुरू आहे. यामुळे स्थानकाच्या समोरील बाजूसच ठेकेदाराचे सामान आणि कामगार ठेवण्यात आले आहेत. मालाची वाहतूकदेखील या ठिकाणाहून केली जात आहे. या स्थानकात सकाळी आणि सायंकाळी गर्दी असते. प्रवाशांना ज्या ठिकाणी उभे राहावे लागते, त्या फलाटाची अवस्था बिकट झाली आहे. फलाटाच्या सर्व फरशा उखडून गेल्या आहेत. काही ठिकाणी गवत उभे राहिले आहे. यामुळे माती आणि धुळीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वीर रेल्वेस्थानकातील प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या शेडचे पत्रे अनेक जागी तुटलेत, तर काही पत्र्यांना तडे गेलेत. यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. रेल्वे थांबते त्या फलाटावरील फरशा उखडून गेल्या आहेत. दुपदरी मार्गाकरिता लागणार्या सामानाची याच फलाटावरून ने-आण केली जात आहे.