अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सज्जड दम
अहमदाबाद : वृत्तसंस्था
आमच्या प्रयत्नामुळे पाकिस्तान थोडा सुधारला आहे. त्यांनी त्यांच्या जमिनीवरून होणार्या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्यात, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आलेल्या ट्रम्प यांनी सोमवारी (दि. 24) अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित नमस्ते ट्रम्प या विशेष कार्यक्रमात पाकिस्तानचे कान टोचले.
पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी माझे सरकार प्रयत्न करीत आहे. कट्टर इस्लामिक दहशवाद संपवण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करेल. भारत-पाकिस्तान सीमेवरील दहशतवादी तळ संपवण्यासाठी आम्ही पाकिस्तानबरोबर काम करीत आहोत. आमचे पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारत असले, तरी त्यांनी दहशतवादी कारवायांसाठी आपली जमीन वापरू देऊ नये, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली.
प्रत्येक देशाला आपल्या सीमांचे संरक्षण करण्याचा हक्क आहे, असे सांगत ट्रम्प यांनी पाकिस्तानकडून होणार्या दहशवादी कारवायांविरोधातील भारताच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवला. पाकिस्तानमधील दहशतवादी गटांची नावे घेत ट्रम्प यांनी भारताच्या शेजारी देशावर थेट निशाणा साधला.
कट्टर इस्लामिक दहशतवाद संपवण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील, असा विश्वास व्यक्त करताना ट्रम्प यांनी इसिस या दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला. आम्ही इसिसचा 100 टक्के खात्मा केला आहे. भविष्यातही इस्लामिक दहशतवादाविरुद्ध दोन्ही देश लढत राहतील, असा माझा विश्वास आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
भारत आणि अमेरिकेचे संबंध दिवसोंदिवस दृढ होत असल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. प्रत्येक अमेरिकन नागरिक भारतीयांना पसंत आणि प्रेम करतोय. भारत आणि अमेरिकेची मैत्री आजपर्यंतची सर्वांत दृढ मैत्री आहे. याआधी दोन्ही देशांत इतकी मैत्री दृढ नव्हती असे सांगत ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारताचे भरभरून कौतुक केले, तसेच पंतप्रधान मोदींवरही स्तुतीसुमने उधळली.
ट्रम्प यांच्याबरोबर पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर दौर्यावर आहेत.