Breaking News

‘सीकेटी’च्या इंग्रजी माध्यमाचे स्नेहसंमेलन उत्साहात

‘रिफ्लेक्शन’ वार्षिक नियतकालिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त

चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन मंगळवारी (दि. 7) अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाले. कार्यक्रमाच्या आरंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. यानंतर शाळेच्या गायकवृंदाने सादर केलेल्या सुरेल ईशस्तवन आणि स्वागतगीताने वातावरण सुमंगल झाले. पर्यवेक्षिका निरजा मॅडम यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. ‘रिफ्लेक्शन’ या वार्षिक नियतकालिकाच्या प्रकाशनानंतर मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी वार्षिक अहवाल सादर करताना विद्यालयाच्या वर्षभरातील प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर उलगडून दाखवला तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारी मंडळाचे विशेष आभार मानले. यानंतर पारितोषिक वितरण सोहळा झाला. वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धा तसेच क्रीडा, कला, संगीत आणि शैक्षणिक क्षेत्रात अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या वेळी गौरविण्यात आले. या सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून माजी विद्यार्थी श्रीनिवास हिंगे आणि संज्योत अंधारे उपस्थित होते. श्रीनिवास हिंंगे यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत स्वत:च्या प्रगतीत शाळेतील शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले तसेच शाळेच्या भिंतीवर असलेल्या महान व्यक्तींच्या माहितीचा उल्लेख करत आपला देश सर्वोत्तम बनवण्याची आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. माजी विद्यार्थिनी संज्योत अंधारे हिने सांगितले की, शाळेने मला संस्कार दिले आणि शाळेतील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने सभाधीटपणा हा गुणही शाळेनेच दिला. तिने विद्यार्थ्यांना संदेश दिला की, आपल्या हृदयात कोणत्याही भीतीला कधी स्थान असता कामा नये. प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ बेहराम मोहता यांनी आपल्या मुलांना गुण छापण्याचे मशिन बनवू नका, तर त्यांच्या अंगी नैतिक मूल्यांची रूजवण करत त्यांना गुणसंपन्न आणि आनंदी आयुष्य जगायला शिकवा, असा संदेश पालकांना दिला. या वेळी मोहताजींनी विद्यालयाच्या प्रगतीचे कौतुक केले तसेच वार्षिक नियतकालिकावरील Your life is a reflection of your thoughts. If you change your thinking, you change your life. या सुविचाराचा उल्लेख केला आणि नियतकालिकाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाचा आढावा घेत जबाबदार नागरिक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या वेळी शाळा समितीच्या अध्यक्षा अर्चना ठाकूर, नगरसेवक तेजस कांडपिळे तसेच नगरसेवक अजय बहिरा, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत तसेच सर्व विभाग प्रमुख हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कलायडोस्कोप या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही विद्यार्थ्यांनीच केले. शाळा समिती अध्यक्षा अर्चना ठाकूर यांनी शेवटपर्यंत कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply