Wednesday , June 7 2023
Breaking News

धावत्या गाडीला लागली आग

तिघांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पूर्व दिल्लीमधील अक्षरधाम उड्डाणपुलाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका महिलेसहत तिच्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला. धावत्या गाडीला अचानक आग लागली. गाडी मध्येच थांबवली असती तर मागून येणार्‍या गाड्यांचाही अपघात होऊन अनेकांचे प्राण धोक्यात आले असते म्हणूनच गाडीचालक उपेंद्र मिश्रा यांनी उड्डाणपुलावर गाडी भररस्त्यात थांबवण्याऐवजी बाजूला घेऊन थांबवली, मात्र तोपर्यंत आग बरीच वाढली होती. उपेंद्र आपल्या एका मुलीला घेऊन कसेबसे गाडीबाहेर पडले, पण गाडीत असणारी त्यांची पत्नी व दोन मुलींचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेचे साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडीत मागील बाजूस बसलेल्या प्रवाशांना बाहेर निघता आले. अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी गाडीचे मागील दरवाजे लॉक झाल्याने तीन जणांचा होपळून मृत्यू झाल्याचे सांगितले. या अपघातात उपेंद्र यांची पत्नी रंजना मिश्रा, मुली रिद्धी आणि निकी या तिघींचा मृत्यू झाला. गाडीला लागलेली आग विझवण्यात आल्यानंतर त्यातील मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. लालबहादूर शास्त्री रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीत अडकलेल्यांचे मृतदेह ओळखू न येण्याइतके जळाले आहेत. क्रेनच्या सहाय्याने जळालेली गाडी रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आणि वाहतूक पूर्ववत झाली. रविवारी कुटुंबाबरोबर फिरायला जाण्यासाठी मिश्रा यांनी गाडी बाहेर काढली आणि हा अपघात झाला. प्राथमिक अंदाजानुसार गाडीच्या सीएनजी युनिटमध्ये आग लागल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply