सेंच्युरियन : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपदाबाबत निवड समितीशी झालेल्या अंतर्गत संभाषणाचा तपशील सांगण्यास भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शनिवारी (दि. 25) नकार दिला; पण कर्णधारपदाचा निर्णय हा निवड समितीच्या कक्षेत येतो, हे मात्र द्रविडने स्पष्ट केले. कोणत्याही कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येला होणार्या कर्णधार पत्रकार परिषदेला सामोरा जातो; पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या आदल्या दिवशी मात्र द्रविड प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सामोरा गेला. दौर्यावर जाण्याआधी भारतातील अखेरच्या पत्रकार परिषदेत कोहलीने केलेल्या भाष्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) त्याचे संबंध चिघळल्याचे प्रत्ययास येत आहेत. कोहलीने ट्वेन्टी-20 प्रकाराचे कर्णधारपद सोडले; परंतु ‘बीसीसीआय’ने त्याचे एकदिवसीय प्रकाराचेही कर्णधारपद काढून घेत रोहित शर्माकडे मर्यादित षटकांच्या दोन्ही संघांचे नेतृत्व सोपवले. मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नसावेत, हे ‘बीसीसीआय’चे धोरण होते. त्यामुळे ट्वेन्टी-20 कर्णधारपद सोडू नये, असा सल्ला कोहलीला दिल्याचे ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले. मात्र मला अशा कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नव्हत्या, असे सांगत कोहलीने वाद निर्माण केला. कर्णधारपदाच्या निर्णयाबाबत तुझे मत विचारले का, याबाबत द्रविड म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे, तर कर्णधारपदाची निवड करणे हे निवड समितीचे कार्य आहे. माझे यासंदर्भात काही संभाषण झाले किंवा नाही, हे महत्त्वाचे नाही. याबाबत चर्चा करण्याचे हे ठिकाण आणि वेळ नाही. अंतर्गत चर्चा काय झाली, हे सार्वजनिक प्रसारासाठी नाही,’ असे शेवटी द्रविडने सांगितले.