Breaking News

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात माथेरान, कर्जत मागे कसे?

केंद्र सरकारने गत वर्षापासून शहरी भागातील स्वच्छतेला महत्त्व देण्यासाठी आणि शहरी भागात राहणार्‍या नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी गुणांकनावर आधारित स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यास सुरुवात केली. देशातील महानगरे, शहरे अशी विभागणी करतानाच लहान शहरे आणि मोठी शहरे असे प्रमाण निश्चित करून शहरांची लोकसंख्या लक्षात घेऊन सर्वेक्षण करून त्यातून बक्षीस योजना जाहीर केली. ही केवळ बक्षीस योजना नव्हती तर ज्याप्रमाणे शहराचे स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गुणांकन असेल त्याप्रमाणे निधीदेखील सरकार देणार होते. त्यामुळे आपल्या शहराला निधी कमी पडू नये म्हणून सर्वच शहरे स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उतरली. त्यातही देशातील अशी काही शहरे आहेत की त्यांना स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची गरज नाही. कारण देशातील अनेक शहरे ही पर्यटनावर अवलंबून असून पर्यटकांसाठी तेथील नागरिक व्यवसाय मिळावा म्हणून आपली पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवत असतात. त्यामुळे अशा शहरांना स्पर्धेची गरज नाही. त्यात माथेरान हे मुंबईपासून जवळ असलेले थंड हवेचे ठिकाण आहे की जेथे पर्यटन व्यवसाय हा एकमेव व्यवसाय असून त्यावर तेथील नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने माथेरान स्वच्छ ठेवण्यावर स्थानिकांचा आणि प्रशासनाचा कायम सहभाग राहिला आहे, मात्र पहिल्या वर्षी घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 2018मध्ये देशातील पश्चिम राज्यात 13व्या क्रमांकावर असलेले माथेरान जे कायम स्वच्छ असते, ते 2019 मध्ये थेट 168व्या क्रमांकावर गेले आहे. हे कसे शक्य आहे यावर खल सुरू असून माथेरान मागे पडले कसे?

माथेरान हे ब्रिटिशांनी 1850 मध्ये शोधलेले थंड हवेचे ठिकाण. माथ्यावरील रान म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील निसर्गसंपदा आबाधित राहावी यासाठी ब्रिटिशांनी घालून दिलेले नियम आणि दंडक हे आजही पाळले जात आहेत. त्यामुळे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण स्वच्छतेसाठी ओळखले जाते. पर्यटन व्यवसाय यावर सर्वस्वी अवलंबून असलेल्या माथेरानमधील स्वच्छता पाहण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेटी देत असतात. माथेरानमधील स्वच्छतेला आपण काय आहोत? हे दाखवून देण्याची संधी पाहिल्यांदा मिळाली ती नागरी स्वच्छता अभियानाने. त्यावेळी माथेरानमधील स्वच्छतेचे उपक्रम हे राज्य पातळीवरील पारितोषिक घेण्यास पात्र ठरले. त्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि त्यातून निर्माण होणारी वीज ही नगरपालिका क्षेत्रातील पहिला यशस्वी प्रयोग ठरली. अशा माथेरानमध्ये 2018 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी माथेरान गिरीस्थान नगर परिषद देशातील पश्चिम भागातील राज्यात 13वी आली. त्यामुळे माथेरानमध्ये स्वच्छता राखण्यासाठी काय केले आहे हे पाहण्यासाठी राज्यातील अनेक पालिका आपल्या

प्रतिनिधींना अभ्यास करण्यासाठी पाठवू लागल्या. गतवर्षी माथेरानमध्ये राबविलेल्या पहिले स्वच्छ सर्वेक्षण अभियान शहरी भागातील स्वच्छतेचे मोजमाप घेण्यासाठी केंद्र पातळीवर राबविण्यास सुरुवात झाली. त्यात शहरी भागातील स्वच्छता चांगली राहावी यासाठी घकचरा व्यवस्थापन, कचर्‍याचे निर्मूलन, कचर्‍याचे वर्गीकरण, कचर्‍याची विल्हेवाट, ओला आणि सुका कचर्‍याचे निर्मूलन, त्यातून निर्मण होणारे उत्पन्नाचे सोर्स, नागरिकांचा सहभाग, नागरिकांच्या तक्रारीनंतर केली जाणारी अंमलबजावणी आदी निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2018मध्ये राबविल्या गेलेल्या अभियानात माथेरान आघाडीवर राहिले.

देशातील पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी स्वच्छतेवर तेथील नगरपालिका प्रशासन जातीने लक्ष देत असते. त्यात कर्जत आणि माथेरानमध्ये कचर्‍याचे वर्गीकरण आणि त्याचे विघटन या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव असलेले मुख्याधिकारी रामदास कोकरे हे काम पाहत असल्याने स्वच्छ सर्वेक्षण अभियान नागरिकांनी राबविले होते. नागरी भागातील स्वच्छता पुरुष म्हणून ओळखले जाणारे रामदास कोकरे हे माथेरानमध्ये मुख्याधिकारी असल्याने त्यांच्या माथेरानमध्ये काही वेगळे प्रयोग झाले आणि त्यामुळे माथेरान 2018पेक्षा पुढे गेलेले असेल असा सर्वांचा समज होता. 2019च्या

सर्वेक्षणात कर्जत आणि माथेरान या शहरांचा डंका वाजणार अशी शक्यता होती. 2019मधील स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची तयारी करताना माथेरान नगरपालिकेने आपल्याकडील डम्पिंग ग्राऊंड कचरा विरहित केला. शून्य डम्पिंग ग्राऊंडची संकल्पना राबविताना माथेरानच्या डम्पिंग ग्राऊंडमधील वर्षानुवर्षे पडून राहिलेला कचरा मिनी ट्रेन आणि अन्य वाहनांच्या माध्यमातून शहराबाहेर नेण्यात माथेरान पालिका यशस्वी ठरली होती. त्याचवेळी महानगरात राबविली जाणारी क्लीन-अप मार्शल ही संकल्पना माथेरानसारख्या पर्यटनस्थळी यशस्वी ठरली असून प्लास्टिकबंदी असलेल्या माथेरानमध्ये पाण्याच्या बाटल्यांचा वापरदेखील कमी करण्यात आणि मुख्य म्हणजे पालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यात पालिका यशस्वी ठरली आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणे नो स्मोकिंग झोन करण्यात आल्याने पर्यटन स्थळ असलेल्या ठिकाणी कुटुंबासह आलेल्या पर्यटकांना दिलासा देणारी बाब ठरली आहे.त्यामुळे गतवर्षी माथेरान हे पश्चिम राज्यात 15वे आलेले शहर यावर्षी चक्क 168व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. तेथे येणार्‍या पर्यटकांना रस्त्यावर झाडांची पानेदेखील शोधून सापडत नाहीत. कचरा डेपोत शून्य कचरा झाला असताना आणि असंख्य कामगार दिवसभर तैनात असताना मात्र माथेरान 2019मध्ये एवढे मागे का, असा प्रश्न पडला असून सर्वेक्षण करताना त्यात काही त्रुटी राहिल्याचा आरोप माथेरानमध्ये होत आहे. माथेरानमध्ये बायोगॅस प्रकल्पावर गॅस तयार होतो. विजेचे दिवे पेटविले जातात. याबाबत खुद्द शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील गुणांकन आमच्या नागरिकांच्या सहकार्यावर आणि पालिका कर्मचार्‍यांच्या दिवसरात्र करीत असलेल्या मेहनतीवर शंका उपस्थित करणारे असल्याची शंका उपस्थित केली आहे. दुसरीकडे माथेरान हे येथील स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त वातावरणामुळे ओळखले जात असल्याने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात असे काय झाले की आम्ही सर्व उपक्रम दररोज राबवूनही मागे पडत आहोत, असा प्रश्न नगराध्यक्षा उपस्थित करीत आहेत.

दुसरीकडे शून्य कचरा डेपो ही संकल्पना यशस्वीपणे राबविणारी कर्जत नगरपालिका मागील वर्षी 28व्या क्रमांकावर होती, ते 53वर पोहचले असून कर्जतमध्ये कचर्‍यापासून गॅसनिर्मिती होते, तसेच कचरा विकून पालिकेने महसूल मिळविला आहे, तर तेथील कचरा डेपो शून्य कचरा डेपो झाला असून अनेक विद्यापीठांचे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येत असताना कर्जत 53वे कसे, हा प्रश्नही सर्वांना पडला आहे.

कर्जतमध्ये तब्बल 32 प्रकारे कचर्‍याचे वर्गीकरण केले जात असून अशा प्रकारे कचरा वर्गीकरण करणारी कर्जत नगरपालिका राज्यात एकमेव असताना कर्जत आणि माथेरान या कायम स्वच्छतेचा पुरस्कार करणार्‍या शहरांना सर्वेक्षणात मागे पडल्याचे बघून येथील नागरिकांसह सर्वांना गुणांकन चुकीचे वाटत आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply