Breaking News

मुरूडमध्ये उलटी-जुलाबाची साथ

डोंगरीत 50पेक्षा जास्त रुग्ण; आंबोली, एकदरातही बाधा

मुरुड : प्रतिनिधी

तालुक्यातील डोंगरी, आंबोली व एकदरा गावांत दूषित पाण्यामुळे उलटी जुलाबाची साथ सुरु झाली असून, रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून, रुग्णांची काळजी घेण्यात यंत्रणा व्यस्त झाली आहे.

डोंगरी, आंबोली व एकदरा या तिन्ही गावांना आंबोली धरणातून पाणी पुरवठा होतो. या धरणातील गाळ गेले कित्येक वर्षे काढलेल्या नाही. त्यामुळे धरणातून गढूळ व दुषीत पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी वापरल्याने अनेकांना उलटी, जुलाब होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पाण्याचे नमुने आम्ही ग्रामपंचायतीला दिले असताना त्यांनी ते तपासणीसाठी पाठवले नाही. जर पाण्याची तपासणी झाली असती तर ही उलटी, जुलाबाची साथ पसरली नसती, असे ग्रामस्थ मंगेश पुलेकर यांचे म्हणणे आहे. एकट्या डोंगरीगावात उलटी, जुलाबाचे 50 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. या साथीने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकही हैराण झाले असून, ते खाजगी दवाखाने तसेच सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या भागात आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद असले तरी ते लांब पडत असल्याने बहुतांशी रुग्ण खाजगी रुग्णालयात जाणे पसंत करीत आहेत. उलटी, जुलाबाच्या  साथीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, आरोग्य खात्याने चांगली प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान,  मुरुडचे गट विकास अधिकारी संजय चव्हाण यांनी डोंगरी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन, तेथील पाण्याच्या टाकीची  तपासणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून, त्यांना पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले. तसेच सर्व ग्रामपंचायतीना  टीसीएल पावडरचा उपयोग करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आंबोली धरणातून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे. आमच्या गावात  उलटी, जुलाबाची बाधा झालेले 50 पेक्षा जास्त रुग्ण असून ते खाजगी दवाखान्यात इलाज घेत आहेत. गावाला चिचघर धरणातून पाणी मिळावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

-मछिंद्र नाईक, गाव अध्यक्ष, डोंगरी, ता. मुरूड

डोंगरी, आंबोली व एकदरा गावात उलटी, जुलाबाची साथ असून, प्रतिबंधात्मक उपाय सुरु करण्यात आले आहेत. ही साथ आटोक्यात असून, डॉक्टर सर्व रुग्णांवर लक्ष ठेऊन आहेत. पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत.

-डॉ. चंद्रकांत जगताप, तालुका आरोग्य अधिकारी, मुरूड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply