महाड ः प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती जल्लोषात साजरी होत असतानाच महाड येथील छत्रपती संभाजी महाराजनगर गोंडाळे येथे रविवारी (दि. 12) जिजाऊंच्या प्रतिमेची विधीवत पूजा करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पनवेल येथून आलेल्या जिजाऊंच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांची जयंती महाड तालुक्यात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवव्याख्याते प्रतीक कालगुडे यांनी जिजाऊंच्या जीवनावर व्याख्यान सादर केले, तर महेश शिंदे यांनी जिजाऊंची जयंती
साजरी करण्याबरोबर त्यांचे थोर विचार समाजात रुजविणे महत्त्वाचे असल्याचे सांगत महिलांनी अशा कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला पाहिजे, असे सांगितले.
जिजाऊंच्या तेजस्वी विचारांनी महिलांसह समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याची जबाबदारी प्रत्येक शिवभक्ताची असल्याचे शिंदे यांनी सांगितले. प्राधिकरणच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनाचे काम उत्तम सुरू असले तरी रायगडावर येणार्या शिवभक्तांकडून घेण्यात येणारे 25 रुपये बंद करावेत, अशी मागणी शिवव्याख्याते प्रतीक कालगुडे यांनी केली. याप्रसंगी नितीन पवार, अशोक पवार, गोसावी समाजाचे तालुकाध्यक्ष संतोष पवार, राजन सुळे, गणेश देशमुख, आयोजक अमोल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.