Breaking News

सिडकोच्या उद्यानाला डबक्याचे स्वरूप; कळंबोलीतील रहिवाशांमध्ये संताप

पनवेल ः वार्ताहर

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 4मध्ये असणार्‍या सिडकोच्या उद्यानाला कोणी वाली नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक व बच्चेकंपनीसाठी असणार्‍या उद्यानात चक्क वाहने उभी केली जात असून उद्यानाची दुरवस्था झाली आहे. याबाबत लेखी तक्रार दाखल करूनही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. उद्यानात केलेल्या चुकीच्या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी साचून उद्यानाला डबक्याचे स्वरूप येत असूनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी लावलेली झाडे जगत नाहीत. याबाबत कळंबोलीवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कळंबोली वसाहत सेक्टर 4 मधील असणारे सिडकोचे उद्यान बेवारस असल्यासारखे झाले आहे. या उद्यानात काही वर्षांपूर्वी भिंतीचे काम केले होते. त्यानंतर त्यामध्ये लाखो रुपये खर्च करून नागरिकांना फिरण्यासाठी पाथ वे व बसण्यासाठी कठडे तयार करण्यात आले. तसेच लोखंडी दरवाजा बसवण्यात आला. लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी बसविण्यात आली, मात्र या उद्यानात कायदा व नियम धाब्यावर बसवून मंडप टाकून सार्वजनिक कार्यक्रम केले जात आहेत. त्यामुळे उद्यानात लहान मुले खेळण्यासाठी किंवा नागरिक चालण्यासाठी जाऊ शकत नव्हते.त्यातच उद्यानाचा लोखंडी दरवाजा चोरीला गेल्याने उद्यानात वाहनचालकांनी आपली वाहने उभी करण्यास सुरुवात केल्याने नेमके उद्यान कोणासाठी आहे, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

 नियम धाब्यवर बसवून वाहने उभी केल्याने उद्यानाचे वाहनतळ झाले आहे. येथील निसर्गप्रेमी नागरिक दरवर्षी उद्यानात स्वयंस्फूर्तीने विविध झाडांची लागवड करतात, मात्र सार्वजनिक कार्यक्रम करणारे नागरिक झाडांची वाट लावून टाकतात. त्यातच पावसाळ्यात उद्यानात चुकीचे बांधकाम केल्याने तळे साचून लावलेली झाडे कुजत आहेत. पावसाळ्यात उद्यानात गवत वाढल्याने सरपटणार्‍या प्राण्यांची भीती नागरिकांना सतावत आहे. याबाबत नागरिकांनी सिडको अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे, मात्र सिडकोच्या अधिकार्‍यांना या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही. याच उद्यानात दारुडे राजरोसपणे दारू पिण्यास बसतात अन् काचेच्या व प्लास्टिक बाटल्या फोडून जातात. उद्यानाच्या आजूबाजूच्या सोसायटीमधील नागरिक सदरचे उद्यान दत्तक घेऊन सुशोभित करण्यास तयार आहेत, मात्र सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. वसाहतीमध्ये सिडकोने कोट्यवधी रुपयांची विकासाची कामे काढली आहेत, मात्र कळंबोलीवासीयांना कोणती विकासकामे केली जाणार आहेत याची माहितीच नाही.

वसाहतीमधील मध्य वस्तीमधील उद्यान लवकरच सुशोभित करावे. त्यामधील वाढलेले गवत काढून टाकावे. उद्यानात साचत असलेले पाणी कायमचे बंद करावे. उद्यानाचे झालेले वाहनतळ कायमस्वरूपी बंद करावे, अशा येथील नागरिकांच्या मागण्या असून याबाबत लवकरच कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. या उद्यानावर अद्याप लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत, मात्र ते सर्व पैसे पाण्यात गेले, असा आरोप येथील रहिवासी करीत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply