Breaking News

इंडिया स्टील कंपनी परिसरात धोकादायक सामुग्री उघड्यावर

खोपोली परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला

खोपोली : प्रतिनिधी

प्रदूषण, अपघात आदीमुळे सतत वादग्रस्त ठरलेल्या खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीच्या आवारात लोखंड बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल लोकवस्तीशेजारी उघड्यावर ठेवण्यात आला आहे. या मालाच्या ढिगार्‍यात नेमके काय व त्याचा दुष्परिणाम याबाबत स्थानिक नागरिकांकडून अनेक शंका घेऊनही कंपनी व्यवस्थापन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने आता याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा विभागाकडे तक्रारी करण्यासाठी रहिवासी सरसावले आहेत.

या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याने यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनी बंद करण्याची कारवाई केली आहे, तसेच वारंवार होणारे अपघात, अनियंत्रित ध्वनी प्रदूषण आदी बाबींमुळे स्थानिक रहिवासी व कंपनी यांच्यात सतत संघर्ष सुरू आहे. अशात कंपनीने लोकवस्तीला लागून कच्च्या मालाचा डोंगर उभा करून जाणीवपूर्वक येथील रहिवाशांत भीती निर्माण होईल अशी स्थिती निर्माण केली आहे. डोंगराएवढ्या या ढिगार्‍यात नेमके काय आहे याची माहिती कंपनी व्यवस्थापन स्पष्ट करीत नसल्याने या बाबतीत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. भविष्यात एखादा स्फोट किंवा धोकादायक स्थिती निर्माण होऊ नये म्हणून कंपनीने सदर कच्चा माल लोकवस्तीपासून लांब सुरक्षित ठिकाणी ठेवावा, ही स्थानिकांची मागणी आहे, मात्र त्याकडे कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने

यासंबंधी प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा विभागाकडे सामूहिक तक्रार करण्यासाठी स्थानिक रहिवासी एकवटत आहेत.

दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत कच्चे लोखंडाचे उत्पादन होते. त्यासाठी भंगार तसेच इतर पोलाद उत्पादन करणार्‍या कंपन्यांतून वेस्टचा साठा करण्यात आला आहे. कंपनीसाठी हा कच्चा माल आहे. यातून कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता नाही, मात्र प्रदूषण मंडळाकडून प्राप्त परवान्यानुसार हा साठा आहे काय, असे विचारले असता त्याबाबत कोणीही अधिकारी काहीही बोलण्यास तयार नसल्याने कंपनी काहीतरी दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply