Thursday , March 23 2023
Breaking News

माथेरान नगर परिषद कार्यालय स्थलांतरास विरोध

कर्जत : बातमीदार

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माथ्यावरचे रान अशी बिरुदावली लाभलेल्या माथेरानला गिरीस्थान म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाल्याने सन 1905 सालापासून माथेरान गिरीस्थान नगर परिषद अस्तित्वात आली. सत्ताधारी शिवसेनेने एकमताने मंजूर झालेल्या एका ठरावाद्वारे प्रशासकीय कार्यालय कम्युनिटी सेंटरमध्ये स्थलांतरित करण्याचे निश्चित केले आहे. त्यास माथेरान शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे.

अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक धुरंधर राजकारण्यांनी या नगर परिषद कार्यालयात बसून लोकहिताचा कारभार उत्कृष्ट पध्दतीने हाताळला होता. या वास्तूला वीर हुतात्मा भाई कोतवाल, देशभक्त भाऊसाहेब राऊत, स्वर्गीय गोपाळराव शिंदे अशा अनेक दिग्गजांचा ऐतिहासिक वारसा लाभला असून आजूबाजूच्या शासकीय यंत्रणेने परिपूर्ण असलेल्या या  नगर परिषदेच्या कार्यालयाचे सध्या 2016च्या निवडणुकीत एकहाती सत्ता काबीज केलेल्या शिवसेनेला या ऐतिहासिक वास्तूचे वावडे ठरत असल्याने सत्ताधारी शिवसेनेने सत्तेच्या जोरावर नियमबाह्य ठराव संमत करून सध्या असलेले ऐतिहासिक कार्यालय कम्युनिटी सेंटर हॉल या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा घाट घातल्याचा आरोप विरोधी पक्ष काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगर परिषद प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केला आहे.

शासनाने शहराच्या मध्यभागी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून माथेरान नगर परिषदेच्या विकास आराखड्यातील साईट क्रमांक 14वर कम्युनिटी सेंटर हॉल म्हणून आरक्षित असून या वास्तूला सामाजिक उपयोगाकरिता अनुदान प्राप्त करून दिले आहे, परंतु सत्ताधारी गटाने या कम्युनिटी सेंटर हॉलचा कार्यालय म्हणून वापर करण्याकरिता महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमांचे उल्लंघन करून ऐतिहासिक कार्यालय स्थलांतर करण्यासाठी घाट घातल्याने या भूमिकेला विरोधी पक्षातील काँग्रेसचे माथेरान शहराध्यक्ष मनोज खेडकर तसेच राष्ट्रवादीचे माथेरान शहराध्यक्ष अजय सावंत यांनी तीव्र विरोध दर्शवत यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून निषेध करू, असा इशाराही नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

Check Also

अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी यांचा पाठपुरावा अलिबाग ः प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. 22) …

Leave a Reply