Breaking News

सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी संघटनेच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सिडको भवन येथे सोमवारी (दि. 13) झाले. या वेळी बोलताना त्यांंनी नवी मुंबईतील प्रकल्पबाधितांशी संबंधित बाबींचे निराकरण करणे हीच ‘दिबां’ना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरेल व त्यास सिडकोचे नेहमीच प्राधान्य असेल, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमास सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक-1 डॉ. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक-2 अशोक शिनगारे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली, सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश तांडेल, सरचिटणीस जे. टी. पाटील, सिडको इंजिनियर्स असोसिएशनचे सरचिटणीस सुरेश ठाकूर, सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनचे कार्याध्यक्ष नरेंद्र हिरे यांच्यासह सिडकोतील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात लोकेश चंद्र यांनी नवी मुंबईच्या उभारणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग अतुलनीय असल्याचे सांगत प्रकल्पग्रस्तांच्या उन्नतीसाठी सिडको नेहमीच विविध उपक्रम राबवित असते व यापुढेही राबवित राहील, असे सांगितले. विनोद पाटील यांनी ‘दिबां’विषयी बोलताना लोकनेते हे बिरुद सहजासहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली असावी लागते, असे सांगत ‘दिबां’नी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना संघटित करून जो लढा उभारला त्यामुळेच प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचा व न्याय्य मोबदला मिळाला, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार काढले. ‘दिबां’नी न भूतो न भविष्यती असे प्रकल्पग्रस्तांचे उभारलेले आंदोलन व त्याचे फलित म्हणून उदयास आलेली 12.5 टक्के योजना हे सारेच अभूतपूर्व आहे. नवी मुंबईतील प्रकल्पबाधित भूमिपुत्र हे सदैव दिबांप्रति ऋणी राहतील, असे निलेश तांडेल यांनी सांगितले.

Check Also

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल …

Leave a Reply