Breaking News

‘कळंबोली येथील सिडको वसाहतींना पायाभूत सुविधा द्या’

पनवेल : बातमीदार

30 वर्षांपूर्वी बांधलेल्या कळंबोलीतील सिडकोच्या वसाहतीतील पायाभूत सुविधा जीर्ण झाल्या आहेत. कंडोनियमच्या आवारातील रस्ते, गटारे, पदपथ मोडकळीस आले आहेत. त्यामुळे सिडकोकडून या मूलभूत सोयीसुविधांचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नगरविकास विभागाकडे करण्यात आली. कळंबोलीतील नागरिक प्रशांत ननावरे यांनी ही मागणी केली.

कळंबोली वसाहतीत सिडकोने 30 वर्षांपूर्वी अत्यल्प उत्पन्न गटातील मोठ्या प्रमाणात घरे बांधली. सोसायटी स्थापन करता येत नसल्यामुळे आजतागायत कंडोनियम म्हणूनच त्याची नोंद आहे. वाढत्या शहरीकरणामुळे या वसाहतीत पायभूत सोयीसुविधांवर ताण आला. एलआयजी, केएल 1, केएल 2, केएल 4, केएल 5, केएल 6 आदी सर्व जुन्या वसाहती सिडको महामंडळाने विकसित केल्या. पूर्वी सर्व वसाहतींतील नालेसफाई, पाण्याची वाहिनी, पदपथ दुरुस्ती, विद्युत दिवे आदींची देखभाल, दुरुस्ती सिडको प्रशासन करीत होते. कालांतराने कंडोनियम धोरणाच्या नावाखाली सिडकोने वसाहतीच्या आतील म्हणजे संरक्षक भिंतीच्या आतील पायाभूत सुविधा आम्ही पुरविणार नाही, असे धोरण अवलंबले. त्यामुळे येथील विकास झाला नाही.

सध्या कळंबोलीत अनेक वसाहतींची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे नगरविकास विभागाला ई-मेल पाठवून या प्रकाराची दखल घेऊन सिडकोने आतील बाजूची पायाभूत कामे करावीत, अशी मागणी कळंबोलीतील नागरिक प्रशांत ननावरे यांनी केली. या कामांमध्ये कंपाऊंडच्या आतील पदपथ दुरुस्ती, विद्युत दिवे, सुशोभीकरण, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाके, दूषित पाणी येणार्‍या पाइपलाइन बदलून देणे, मलनि:स्सारण वाहिनी बदलणे, इमारतीच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply