कोरोनाशी लढण्याचे कविंनी दिले आत्मिक बळ
माणगाव : प्रतिनिधी
कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने सर्वकाही ठप्प झाले असून साहित्य, संस्कृती व कला क्षेत्रही शांत आहेत. या काळात साहित्य व कला क्षेत्राला उभारी देण्यासाठी जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी रविवारी (दि. 19) ऑनलाइन काव्यसंमेलनाचे आयोजन केले होते. कोरोनामुळे आलेली उदासीनता व मरगळ झटकून टाकून मानवी मनाला उभारी मिळावी यासाठी कवितेतून नवचैतन्य फुलविण्यात आले.
सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांच्या शुभ संदेशाने काव्यसंमेलनाचे उद्घाटन झाले. प्रा. एल. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात जिल्ह्यातील एकूण 23 कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. विविध सामाजिक आशयाच्या व कोरोनाशी मुकाबला करण्याची प्रेरणा देणार्या कविता, गझल मान्यवरांनी सादर केल्या. यामध्ये गझलकार ज्योत्स्ना राजपूत, रघुनाथ पोवार, हनुमंत शिंदे,संध्या दिवकर, अशोक कदम तसेच कवी संजय गुंजाळ (दक्षिण रायगड अध्यक्ष), सुधाकर चव्हाण (उत्तर रायगड), हेमंत बारटक्के, स्नेहा गांधी, अपर्णा जंगम, सिद्धेश लखमदे, प्रा. भरत जोशी, प्रा. प्रणय इंगळे, संदीप जामकर, उल्का माडेकर, बाबाजी धोत्रे, अविनाश सहस्त्रबुद्धे, शर्मिला जोशी, रामजी कदम, भूषण कुडेकर, अनिता कांबळे आदींचा सहभाग होता.
कोरोनामुळे चिंतीत झालेल्या मनाला आपल्या काव्यातून उभारी देण्याचा प्रयत्न कवींनी केला. ऑनलाईन सादर झालेल्या या उपक्रमास काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. अनेक नामवंत कवींच्या रचना घरी बसल्या ऐकायला व पहावयास मिळाल्याबद्दल अनेक रसिकांनी समाधान व्यक्त केले. या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन अजित शेडगे यांनी, तर रघुनाथ पोवार व हेमंत बारटक्के यांनी नेटके नियोजन केले.