Breaking News

कोरोनामुळे पावसाळी पर्यटनाला फटका; धबधबे पडले ओस

माणगाव ः प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदर्‍यांतील धबधब्यांचे. अनेक जण पावसाळी विरंगुळा व हौस म्हणून धबधब्यांना जवळ करतात व मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. यंदा मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे पर्यटन बंद असल्याने व साथीच्या भीतीने ताम्हिणी घाटातील धबधबे ओस पडले असून यानिमित्ताने होणारा व्यवसाय व स्थानिकांची रोजीरोटी बंद झाली आहे.

प्रतिवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाट हा रायगडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटकांचे मोठे आकर्षण असते. ताम्हिणी घाटातील नैसर्गिक रचनेमुळे पावसाळ्यात या ठिकाणी सुंदर असे परिसर व मोठमोठे धबधबे निर्माण होतात. त्यामुळे ताम्हिणी घाट पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची प्रथम पसंती असतो. या वर्षी पाऊस सुरू होऊन जवळपास एक महिना झाला असून घाटातील धबधबे सुरू झाले आहेत, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा असलेला धोका लक्षात घेऊन पर्यटनबंदी असल्याने याचा परिणाम धबधब्यांच्या पर्यटनावरही झाला आहे.

पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने स्थानिक लोकांना विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध होतो. चहाची टपरी, मकाविक्री आदी खाद्यपदार्थांना या वेळी चांगली मागणी असते. अनेक जणांना यानिमित्ताने रोजगार उपलब्ध होतो. यंदा मात्र कोरोनामुळे पर्यटकांनी धबधब्यांकडे पाठ फिरविल्याने पावसाळी पर्यटनाला मोठा फटका बसत असून स्थानिकांची रोजीरोटी बुडत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply