Breaking News

नवसूचीवाडी ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात

धार नदीवर उभारला बंधारा; प्रादेशिक बंदर विभाग कार्यालयाचा पुढाकार

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील नवसूचीवाडीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. त्यावर शासन स्तरावर आजवर उपाय योजना होऊ शकलेली नाही. त्यामुळे अलिबाग येथील प्रादेशिक बंदर विभागाने नवसूचीवाडीमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने नदीवर श्रमदानातून बंधार्‍यांची निर्मिती केली आहे. डोंगराळ भागात असलेल्या नवसूचीवाडीत सुमारे 100 ते 200 घरांची वस्ती येथे आहे. या वाडीजवळून धार नदी वाहते. मात्र एप्रिल महिन्यामध्ये नदीचे पाणी पूर्ण आटते, त्यानंतर पुढील मे व जूनमध्ये ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरु होते. प्रामुख्याने महिलांना दोन-तीन किलोमीटर पायपीट करुन पाणी आणावे लागते. याची जाणिव असलेल्या व गावातून शिकून सध्या प्रादेशिक बंदर विभागाच्या अलिबाग कार्यालयात बंदर निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महेश लक्ष्मण होले यांनी आपल्या वरिष्ठ, सहकारी व ग्रामस्थ यांच्या बरोबर चर्चा केली व श्रमदान करून नदीवर बंधारा बांधण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे प्रादेशिक बंदर विभाग कार्यालय तसेच नवसूचीवाडी, हर्‍याचीवाडी व कुरुंग येथील 200 ग्रामस्थांनी श्रमदान करत धार नदीवर बंधारा बांधून पूर्ण केला आहे. या बंधार्‍यातील पाणी जलवाहिनीद्वारे नवसूचीवाडीत पोहचविण्याचा पुढील मानस असल्याचे बंदर निरीक्षक महेश होले व वारे ग्रामपंचायत सदस्य भास्कर कमळू कांबडी यांनी सांगितले. या उपक्रमात आंतरराष्ट्रीय तिरंदाज कॅप्टन अजित टोपणो, प्रादेशिक बंदर विभागाचे निरीक्षक महेश होले, समीर बारापात्रे, अमर पालवणकर, लिपिक आशिष सानकर, अजय चव्हाण, लेखापाल शैलेश खोत, ग्रामपंचायत सदस्य भास्कर कामडी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply