Breaking News

सरकारी वकील न्यायालयात अनुपस्थित

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण

पनवेल : बातमीदार

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटला चालविण्यासाठी गृह विभागाने अपेक्षित मानधन न दिल्यामुळे शुक्रवारी (दि. 17) विशेष सरकारी वकील प्रदीप घरत हे पनवेल न्यायालयात अश्विनी बिद्रे खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वीच प्रदीप घरत यांनी या खटल्यातून वकीलपत्र काढून घेत असल्याचे पत्र गृह विभागाला दिले होते, मात्र त्यानंतरही राज्य सरकारकडून याबाबत काहीच हालचाली न झाल्याने अ‍ॅड. प्रदीप घरत हे शुक्रवारच्या सुनावणीसाठी हजर झाले नसल्याचे बोलले जात आहे. घरत यांच्या या निर्णयामुळे अश्विनी बिद्रे हत्या खटल्याचे कामकाज लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे. गृह विभागाने अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी अ‍ॅड. प्रदीप घरत यांना अत्यंत कमी मानधन मंजूर केले आहे. हा खटला अन्य खटल्यांपेक्षा किचकट असून संवेदनशीलही आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हा पोलीस अधिकारी, तर दुसरा आरोपी राजेश पाटील हा एका बड्या राजकीय नेत्याचा भाचा आहे. त्याचा विपरीत परिणाम या खटल्यावर झाला आहे. त्यामुळे या खटल्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे घरत यांनी मानधनात वाढ करून मिळावी, अशी मागणी गृह विभागाकडे केली होती, मात्र गृह विभागाने घरत यांनी मागितलेल्या रकमेच्या निम्मेच मानधन त्यांना दिले आहे. त्यामुळे त्यांनी या खटल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मागणीनुसार जर मानधन मिळाले नाही, तर आपण पुढील सुनावणीला न्यायालयात उपस्थित राहणार नाही, असा इशारा त्यांनी मागील सुनावणीच्या वेळी दिला होता. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ते उपस्थित राहिले नाहीत, असे बोलले जात आहे. खटला चालविणार्‍या सरकारी वकिलानेच या खटल्यातून अंग काढून घेतल्याने अश्विनी बिद्रे हत्याखटला पुन्हा वार्‍यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारपासून या खटल्यातील दुसरे साक्षीदार अश्विनी यांचे पती राजू गोरे यांची तपासणी सुरू होणार होती, मात्र आता ती लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार खासदार बारणेंच्या प्रचारार्थ खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शो

पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य …

Leave a Reply