प्लास्टिक पिशव्या व दंडात्मक रोख रक्कम गटविकास अधिकार्यांकडे सुपूर्द

मोहोपाडा : प्रतिनिधी
भारत स्वच्छता अभियानाला वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीने उत्तम प्रतिसाद देत ग्रामपंचायतीच्या वासांबे स्वच्छता समितीने मोहोपाडा बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्या वापरणार्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून परिसरात प्लास्टिक पिशव्या पुरविणार्या रिक्षा पकडून त्यातील जवळपास 70 किलो वजनी प्लास्टिक पिशव्या जप्त करून दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करीत रोख रक्कम गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे सुपूर्द केली. शासनाने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असताना रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणार्या मोहोपाडा शहरातील दुकानात प्लास्टिक पिशव्या बंदीविरोधात ठोस पावले उचलण्यात आली. या वेळी दुकानदार, फेरीवाल्यांकडून पिशव्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्वच्छता समितीचे अध्यक्ष अरुण गायकवाड, रेश्मा भगत, विवेक ओक, सुप्रिया गायकर, मिलिंद कावडे आदींनी केली. वासांबे स्वच्छता समितीच्या वतीने याआधीही शेकडो किलो प्लास्टिक पिशव्या व रोख 86 हजार रुपये वासांबे ग्रामपंचायतीकडे जमा केले. 70 किलो प्लास्टिक पिशव्या व रोख 13 हजार खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय भोये, विस्तार अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी संजय बडे व सरपंच ताई पवार यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी वासांबे स्वच्छता समिती पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.