पनवेल : बातमीदार
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यामध्ये हातोड्याने प्रहार करून तिची हत्या करणार्या श्रीनिवास सुब्बाराव चित्तुरी (45)याला पनवेल सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जानेवारी 2016मध्ये ही घटना खारघरमधील केंद्रीय विहारमध्ये घडली होती.
या गुन्ह्यातील आरोपी श्रीनिवास हा शिक्षिका असलेली पत्नी पुष्पा व दोन मुलांसह खारघरमधील केंद्रीय विहार वसाहतीत राहत होता. मात्र त्यावेळी तो कामानिमित्त परदेशात गेला होता. वर्षभरानंतर श्रीनिवास परदेशातून खारघर येथील घरी आल्यानंतर त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला होता. त्यामुळे या दोघा पती-पत्नींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामध्ये श्रीनिवास याने रागाच्या भरात पुष्पाच्या डोक्यामध्ये लोखंडी हातोड्याने प्रहार करून तिची हत्या केली. त्यानंतर श्रीनिवास याने स्वत:च्या सहावर्षीय मुलाला सोबत घेऊन ठाणे येथील नातेवाईकाचे घर गाठले होते. त्यानंतर त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती नातेवाईकांना दिली होती. त्यानंतर खारघर पोलिसांनी श्रीनिवास याला पत्नीच्या हत्येप्रकरणात अटक केली होती. खारघर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक भानू खटावकर यांनी या गुन्ह्याचा तपास करून श्रीनिवास याच्या विरोधात अलिबाग सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू होती. नंतर या खटल्याची सुनावणी पनवेल येथील सत्र न्यायालयात झाली. ही घटना रागाच्या भरात घडल्याचे साक्षी पुराव्यावरून आढळून आल्याने न्या. राजेश अस्मार यांनी उपलब्ध साक्षी पुराव्यावरून श्रीनिवास याला दोषी ठरवून त्याला पाच वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यातील आरोपी कारागृहात आहे.